Join us  

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:50 AM

महाराष्ट्रातील धडाडीच्या व नावाजलेल्या पत्रकारांमध्ये दिनू रणदिवे यांचे नाव घेतले जाते.

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे दादर येथील निवासस्थानी आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. १६ मे रोजी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. देशाचा स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी सहभाग घेतला आहे.

महाराष्ट्रातील धडाडीच्या व नावाजलेल्या पत्रकारांमध्ये दिनू रणदिवे यांचे नाव घेतले जाते. रणदिवे यांचा जन्म डहाणूतील आदिवासीबहुल भागात १९२५ साली झाला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालिक सुरू केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात येथूनच झाली होती. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रणदिवे रूजू झाले व मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. १९८५ मध्ये ते मटातून निवृत्त झाले. दलित, उपेक्षित, शोषित, कामगारांचे प्रश्न मांडतानाच त्यांनी राजकीय पत्रकारितेतही मोलाचे योगदान दिले आहे. 

दिनू रणदिवे यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये दीर्घकाळ काम केले. सन १९८५मध्ये ते मटातून सेवानिवृत्त झाले. रणदिवे यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये मुख्य वार्ताहर म्हणून अनेक वर्ष काम केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत रणदिवे यांचे मोठे योगदान असून संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे. १९५५ साली समाजवादी पक्षाने छेडलेल्या “गोवा मुक्ती संग्राम” मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे व कॉम्रेड डांगे सोबत रणदिवेंनी कारावास ही भोगला होता.

 

टॅग्स :वार्ताहर