- मनोहर कुंभेजकरमुंबई - शिवसेनेचा मुख्यमंत्री जोपर्यंत या महाराष्ट्रात होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही अशी सात वर्षांपासूनची शिवसेनेच्या महिला विभागसंघटक व पालिकेच्या जेेष्ठ नगरसेविका राजूल पटेल यांची भीष्मप्रतिज्ञा आता पूर्ण होणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दि,17 नोव्हेंबर 2012 रोजी झालेल्या महानिर्वाणानंतर राजूल पटेल यांना खूप दुःख झाले होते.शिवसेनाप्रमुखांवर नितांत श्रध्दा असणाऱ्यांना नगरसेविका राजुल पटेल यांनी शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा झाला नाही ही खंत त्यांच्या मनात होती.यावेळी त्यांनी स्वतः दृढ निश्चय केला की, जोपर्यंत या महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत नाही तो पर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती अशी माहिती राजुल पटेल यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
गेली सात वर्षे अनवाणी फिरणाऱ्या राजूल पटेल यांना अनेक जणांनी यापासून त्यांच्या भीष्म प्रतिज्ञा पासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले, पण रस्ता कितीही खडतर असला तरी त्यांनी आपली प्रतिज्ञा मोडली नाही अशी माहिती शिवसेनेचे वर्सोवा विधानसभेचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
२०१४ साली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री न झाल्यामुळे त्यांची शपथ पूर्ण होऊ शकली नाही.२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत राजूल पटेल यांनी वर्सोवा विभागातील भाजप पुरस्कृत शिवसंग्रामच्या उमेदवार डॉ भारती लव्हेकर यांच्या विरोधात बंडखोरी केली व तांत्रिकदृष्ट्या जरी त्यांना शिवसेनेचे अधिकृत चिन्ह "धनुष्य बाण" त्यांना मिळाले नाही. सर्व शिवसैनिकांचा व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळवत त्यांनी ३२७०६ एवढ्या मोठ्या मताच्या आकड्यापर्यंत मजल मारली.त्यांनी 15 दिवसांच्या प्रचारात वर्सोवा विधानसभा मतदारसंघ अनवाणी पायाने पिंजून काढत तब्बल 300 किमी फिरून घरोघरी प्रचार केला अशी माहिती शेट्ये यांनी दिली.
राजुल पटेल या राजूलताई म्हणून शिवसैनिकांत व मतदारांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी दि,17 नोव्हेंबर 2012 रोजी केलेली ही भीष्मप्रतिज्ञा आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवतीर्थवर मुख्यमंत्रीपदाची गेल्या दि,28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर पूर्णत्वास आली.
त्यामुळे आता येत्या दि,27 डिसेंबर रोजी ५१ शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसमवेत आदिमायाशक्ती कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेणार आहेत.आमदार व विभागप्रमुख अँड.अनिल परब यांचा येत्या दि,31 डिसेंबरला वाढदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधत मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजूलताई पायात चप्पल घालून ही सात वर्षापासूनची भीष्म प्रतिज्ञा त्या पूर्ण करतील अशी माहिती राजेश शेट्ये यांनी शेवटी दिली.