Join us  

व्हेंटिलेटरअभावी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 6:14 AM

सायन रुग्णालयात ब्रेन हॅमरेजच्या उपचारांकरिता दाखल झालेल्या ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : सायन रुग्णालयात ब्रेन हॅमरेजच्या उपचारांकरिता दाखल झालेल्या ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याविषयी सायन रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.अंबरनाथ येथील रहिवासी असलेले नबी अहमद अन्सारी (६५) यांना ब्रेन हॅमरेजच्या उपचारांकरिता खासगी रुग्णालयातून सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायन रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्हेंटिलेटर उपलब्ध होणे गरजेचे होते. मात्र ही उपलब्धता नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्रतिक्रिया नूर अन्सारी यांनी दिली. याविषयी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांना विचारले असता, व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण दगावल्याची माहिती नसून चौकशी करून सांगतो, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे, व्हेंटिलेटरप्रमाणे अ‍ॅम्ब्यू पंपही कार्य करत असते. त्यामुळे त्याचाही वापर करण्यात येतो, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची अत्यंत गैरसोय होत असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. यामुळे नबी अन्सारी यांना व्हेंटिलेटर न मिळाल्याने दर दोन तासांनी त्यांच्यावर ‘अ‍ॅम्ब्यू पंप’ने उपचार सुरू होते. पालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्येही त्यांच्या नातेवाइकांनी व्हेंटिलेटरबाबत चौकशी केली, पण तेथेही उपलब्ध नव्हते. परिणामी उपचारांविना त्यांचे निधन झाले, असा आरोप नूर अन्सारी यांनी केला.