Join us  

सांभाळा रे! 'लालबागचा राजा'च्या दर्शनावेळी भाविकांची चेंगराचेंगरी, ज्येष्ठ नागरिक खाली पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 11:01 AM

गणेशोत्सवाच्या आदल्या दिवसांपासून भाविकांनी रांग लावली. याच गर्दीतुन आतमध्ये येताना भाविकांची गर्दी थेट गेटमध्ये अडकल्याचे दिसते.

मुंबई: गणेशोत्सवाची मुंबईत लगबग दिसत असली तरी लक्ष वेधून घेते ती लालबाग आणि परळ या भागातील गर्दी. त्यामुळे येथील छोटे-मोठे रस्ते भाविकांनी फुलून गेले आहेत. सर्वांचे आकर्षण असलेला लालबागचा राजा म्हटले की गर्दी ही आलीच. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासून मोठ्या संख्येने भाविक राजाच्या दर्शनासाठी येतात. याच गर्दीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.

गणेशोत्सवाच्या आदल्या दिवसांपासून भाविकांनी रांग लावली. याच गर्दीतुन आतमध्ये येताना भाविकांची गर्दी थेट गेटमध्ये अडकल्याचे दिसते. यातून कसेबसे आता येत नाही, तोच गर्दी थेट आतमध्ये येताना दिसते. याच गर्दीत लहान मुलांसह, वृद्ध आई-वडिलांना घेऊन आलेले भाविक एकमेकांवर पडतात की काय असे वाटते. या दरम्यान हातात चिमुकल्यांना घेऊन आत येत असताना काही जण त्यांच्या डोक्यात मारतानाही दिसून येत आहे. लालबागच्या राजाच्या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्याकडे विचारणा करताच त्यांनीही काहीही प्रतिसाद दिला नाही. तसेच पोलिसांकडूनही याबाबत प्रतिसाद देण्यात आलेला नाही. 

दरम्यान, सुरुवातीच्या काळात लालगबाच्या राजाचे देखावे आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. परंतु गेल्या दशकभरात राजाची सिहासनावर आरूढ झालेली भव्य मूर्ती हेच भाविकांसाठी मोठे आकर्षण झाले आहे. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असल्यामुळे राजकारणी, खेळाडू, सामाजिक क्षेत्रातली मंडळी आणि कलाकार राजाच्या चरणी नतमस्तक होत असल्यामुळे अन्य राज्यांतील भाविकही गर्दी करू लागले आहेत. 

शाहरुखही वेटिंगवर-

गुरुवारी अभिनेता शाहरुख खान कुटुंबासह दर्शनासाठी आला असताना गर्दीमुळे त्यांनाही काही वेळ वेटिंग करण्याची वेळ ओढवली होती. 

टॅग्स :लालबागचा राजामुंबई