Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी होणार !

By admin | Updated: January 19, 2015 00:44 IST

ज्येष्ठ नागरिक हेच श्रेष्ठ नागरिक असून, ते केवळ मुंबईसारख्या महानगरपालिकेचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भूषण व मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत

मुंबई : ज्येष्ठ नागरिक हेच श्रेष्ठ नागरिक असून, ते केवळ मुंबईसारख्या महानगरपालिकेचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भूषण व मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले. तसेच ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक धोरण घोषित करणारी देशातील पहिली महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचे नाव घेतले जाते, त्याचप्रमाणे या धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करणारी पहिली महापालिका म्हणून मुंबई महापालिकेलाच ओळखले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद सोहळा व सत्कार समारंभादरम्यान त्या बोलत होत्या. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभाच्या सुरुवातीला महापौरांनी ‘स्वच्छ भारत - स्वच्छ मुंबई’ प्रबोधन अभियानाचे औचित्य लक्षात घेत उपस्थितांना स्वच्छतेशी कटिबद्ध राहण्याची शपथ दिली. महापालिकेच्या ५४ उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शक्य तेथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रदेखील उभारण्यात येणार असून, याकरिता असणारी प्रशासनिक कार्यवाही अधिकाधिक सुलभ व सोपी करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी या वेळी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)