Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील मेसेज पाठवणाऱ्यास चोपले

By admin | Updated: January 26, 2016 02:14 IST

कॉलेजच्या सूचना फलकावर लिहिलेले तीन मुलींचे मोबाइल क्रमांक घेऊन त्यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला त्या तीन युवतींनी चांगलाच चोप दिला.

मुंबई : कॉलेजच्या सूचना फलकावर लिहिलेले तीन मुलींचे मोबाइल क्रमांक घेऊन त्यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला त्या तीन युवतींनी चांगलाच चोप दिला. अनिल छेडालाल जैन (४०) असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी रोजी जैन के. सी. कॉलेजमध्ये गेला होता. तेव्हा कॉलेजमध्ये नृत्य स्पर्धेसंदर्भात संपर्क करण्यासाठी तीन तरुणींचे क्रमांक सूचना फलकावर लावले होते. कॉलेजमध्ये फेरफटका मारताना जैनची नजर या बोर्डावर पडली. त्याने त्याचा फोटो काढून पत्रकावरील तरुणींच्या मोबाइल क्रमांकावर अश्लील मेसेज पाठवणे सुरू केले. सुरुवातीला या तरुणींनी दुर्लक्ष केले. त्यात हे मेसेज एकाच क्रमांकावरून येत असल्याचे या तिन्ही मैत्रिणींच्या लक्षात आले. त्यानुसार आरोपीला गुंतवून ठेवण्यासाठी मेसेजला उत्तर देणे या युवतींनी सुरू केले.ठरल्याप्रमाणे एकीने जैनला सुरुवातीला मरिन ड्राइव्हकडे बोलावले. जैनची ओळख पटताच रविवारी त्याला गिरगाव चौपाटीवर बोलावण्यात आले. तेव्हा दिमाखात तरुणीला भेटण्यासाठी आलेल्या जैनला तिन्ही तरुणींनी घेरून चांगलाच चोप दिला. त्याला फटके देत डी. बी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. डी. बी. मार्ग पोलिसांनी जैनला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासात तो गोरेगाव येथील रहिवासी असून अंधेरी येथील कंपनीत कामाला असल्याचे समोर आले. (प्रतिनिधी)