Join us

सेना-भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: March 30, 2015 23:39 IST

कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार अखेरचा दिवस आहे.

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची एकच झुंबड उडाली. दिवसभरात ३८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजेपासून नगर परिषद कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची एकच गर्दी झाली होती. अनेक अपक्ष उमेदवारा प्रमाणे भाजपचे राजेंद्र घोरपडे,मिलिंद नार्वेकर, मनोज ढिले, शिवसेनेचे राजेंद्र चव्हाण, शैलेश वडनेरे, बाबू पालांडे आदींसह शिवसेना व भाजपच्या काही इच्छूक उमेदवारांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे शिवसेना भाजपच्या एकाही इच्छूक उमेदवाराने अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नाही. पालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप युती होणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवसांपासून बदलापूरच्या राजकीय वर्तुळात होत आहेत. त्यामुळे एबी फॉर्मशिवाय दाखल झालेले शिवसेना भाजपचे उमदेवारी अर्ज शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्जही एबी फॉर्मशिवाय कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने या दोन्ही पक्षांचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी अपेक्षा होती. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या काही इच्छुकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु त्यांनीही अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे गृहीत धरून पोलिसांनी नगर परिषद परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळात नगर परिषद कार्यालय समोरील रस्ता बॅरिकेड लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. ३ पोलिस निरीक्षक, २ सहाय्यक पोलिस निरीक्षक ३ पोलिस निरीक्षक तसेच ७० पोलिस कर्मचार्यांची या बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. (प्रतिनिधी)