Join us  

‘सेल्फी विथ मेरी माटी’ची गिनीज बुकमध्ये नाेंद, अण्णा भाऊंच्या साहित्याच्या खंडांचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 1:03 PM

या अभियानाचा भाग म्हणून महाराष्ट्रात ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांप्रति सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा भाग म्हणून महाराष्ट्रात ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. ही बाब अभिमानाची असल्याचे सांगून राज्यपाल रमेश बैस यांनी सर्वांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या नव्या आवृत्तीचे, ई-बुक आणि ऑडिओ बुकचे यावेळी प्रकाशन झाले याचा आनंद राज्यपालांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान सोहळा पार पडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

ही महाराष्ट्राला दिवाळी भेट : मुख्यमंत्री    ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणे ही दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला मिळालेली भेट आहे. देशप्रेमाच्या भावनेतून हा उपक्रम यशस्वी करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या मातीने आपल्याला स्वातंत्र्यसेनानी दिले. याबद्दल प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात आपल्या मातीबद्दल देशभावनेचे अभियान राबविण्यात आले. 

    चीनचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समोर आला असल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.

टॅग्स :मुंबईगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड