Join us  

केबलचालक प्रक्षेपणासाठी उभारणार स्वत:ची यंत्रणा; बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 5:06 AM

ट्रायच्या सुधारित नियमांना केबलचालकांचा विरोध कायम

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने जारी केलेल्या सुधारित नियमावलीचा फटका केबलचालक व ग्राहक दोघांना बसण्याची भीती केबलचालकांनी व्यक्त केली. गतवर्षी नियमावली लागू केलेली असताना पुन्हा सुधारित नियमावली जारी केल्याने गोंधळ उडण्याची शक्यता आहे, त्यामुळे केबलचालकांनी या नियमावलीला विरोध दर्शवला आहे. मल्टी सर्व्हिस आॅपरेटर (एमएसओ)च्या माध्यमातून केबलचालकांना त्रास होत असल्याचा आरोप करीत ब्रॉडकास्टर्सकडून येणाऱ्या वाहिन्यांचे प्रक्षेपण ग्राहकाच्या घरात करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा स्वत: उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिव केबल सेनेचे सरचिटणीस विनय (राजू) पाटील यांनी दिली.

परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात झालेल्या या बैठकीला मोठ्या संख्येने केबलचालक उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष आमदार सुनील राऊत यांनी याबाबत केबलचालकांवरील अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेण्यात येणार असून त्यांच्यासमोर केबलचालकांना भेडसावणाºया समस्या मांडण्यात येणार आहेत. सध्या केबलचालकांना एमएसओवर अवलंबून राहावे लागते. हे परावलंबित्व झुगारून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी भूपेश गुप्ता, बाळा कदम यांच्यासहित केबलचालक उपस्थित होते.

नवीन नियमावलीमध्ये ग्राहकांना पॅकेजमध्ये मिळणाºया वाहिन्यांची किंमत १९ रुपयांवरून १२ रुपये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या आवडीच्या, टीआरपी असलेल्या वाहिन्यांची किंमत १९ रुपये करून या वाहिन्या पॅकेजबाहेर ठेवण्यात येतील व ज्या वाहिन्यांना टीआरपी नाही त्या वाहिन्या १२ रुपये दराने पॅकेजमध्ये ठेवण्यात येतील. यामुळे अंतिमत: ग्राहकांना वाढीव दराने वाहिन्या पाहाव्या लागतील, अशी भीती राजू पाटील यांनी व्यक्त केली. नवीन नियमावलीमुळे ग्राहक व केबल आॅपरेटर दोघांना फटका बसण्याची भीती असून त्याविरोधात केबलचालक एकत्रित येऊ लागल्याचे चित्र आहे.

बदलत्या नियमांचा फटका ग्राहकांनाट्रायने गेल्या वर्षी नियमात बदल करत ग्राहकांचा फायदा होईल, असा दावा केला होता. पण प्रत्याक्षात ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे देऊ न कमी वाहिन्या पाहता येत होत्या. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर पुन्हा एकदा ट्रायकडून नियमात सुधारणा करण्यात आली आहे. पण ब्रॉडकास्टर्सकडून सुयोग्य प्रकारे पॅकेजमध्ये वाहिन्यांचा समावेश केल्यास त्याचा फायदा ग्राहकांना होईल. पण प्रत्यक्षात त्या उलट चित्र दिसून आले तर ग्राहकांना त्याचा फटका बसेल, अशी शक्यता संघटनेकडून व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :ट्राय