नामदेव मोरे, नवी मुंबईनिवडणुकीत सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते प्रतिस्पर्धी उमेदवारांची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. यामधूनच काही ठिकाणी सोसायटीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचार करण्यास व पत्रके वाटण्यास मनाई केली जात असून त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी कार्यकते आणि पदाधिकारी करत आहेत. ऐरोली व बेलापूर मतदार संघामधील निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविली आहे. राष्ट्रवादी बालेकिल्ला पुन्हा राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवसेनेला या मतदार संघांमध्ये विजयाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. काँगे्रस, मनसे व भाजपा ताकद आजमावत आहे. जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी कामाला लागले आहेत. उमेदवार व पदाधिकारी घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन करत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांची ताकद कमी करण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी उमेदवारांना प्रचार करण्यास अडचण निर्माण होत आहे. काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ठरावीक पक्षांचे प्राबल्य आहे. अशा ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश नाकारले जात आहेत. काही ठिकाणी पत्रके वाटू दिली जात नसल्याच्या तक्रारी काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यामुळे उमेदवारांची प्रचार करताना अडचण होत आहे. कोपरखैरणेमध्ये एका सोसायटीमध्ये नुकताच काँगे्रसच्या उमेदवाराला प्रवेश देण्यात आला नव्हता. नेरूळ परिसरामध्ये एका सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसलाही प्रचार करण्यास अडथळा निर्माण होत असून पत्रके वाटू दिली जात नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये यावेळी प्रथमच शिवसेनेची पत्रके पोहचणार आहेत. या ठिकाणी कार्यकर्त्यांना जाता येत नाही. परंतु सोसायटीची परवानगी घेतली की त्यांच्या यंत्रणेमार्फत पत्रके वाटण्यात येतात. बेलापूर मतदार संघात एका ठिकाणी शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी पथनाट्याचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी पथनाट्य व पत्रके वाटण्यास विरोध केला होता. परंतु नियमावर बोट ठेवताच संबंधितांचा विरोध मावळला. काही वर्षांपूर्वी ऐरोलीमध्ये एका पोटनिवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराची रॅली आली की चाळीमधील वीजपुरवठा खंडित केला जात होता. अशाचप्रकारचे अनेक अडथळे विधानसभेच्या प्रचारात सध्या उमेदवारांसमोर उभे राहिले आहेत.
सोसायट्यांची स्वयंघोषित प्रचारबंदी
By admin | Updated: October 7, 2014 01:43 IST