Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांची कामे वेळापत्रकानुसार पूर्ण होतील यावर लक्ष द्या, मुंबई मनपा आयुक्तांचे निर्देश

By जयंत होवाळ | Updated: March 23, 2024 18:40 IST

Mumbai News: मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांची कामे वेळापत्रकानुसार पूर्ण होतील यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ.भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिले. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी शनिवारी कोस्टल रोड आणि रेसकोर्सला भेट दिली.

- जयंत होवाळ मुंबई - मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांची कामे वेळापत्रकानुसार पूर्ण होतील यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ.भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिले. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी शनिवारी कोस्टल रोड आणि रेसकोर्सला भेट दिली.

रेसकोर्सच्या एकूण भूखंडापैकी महानगरपालिकेला सुपूर्द केलेल्या १२० एकर जागेवर तसेच रेसकोर्स परिसरामध्ये लागून असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामध्ये १७० एकर जागेवर मिळून एकूण ३०० एकर जागेवर थीम पार्क विकसित करण्याचे नियोजित आहे. मुंबई सेंट्रल पार्क या नावाने ओळखण्यात येणाऱ्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पाच्या प्रस्तावित आराखड्याची व त्यानुसार प्रत्यक्ष स्थळावरील स्थिती जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी सकाळपासून पाहणी केली.

रेसकोर्सवरील सार्वजनिक उद्यान आणि पलीकडील मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील उद्यान यांना जोडण्यासाठी भूयारी मार्ग, नागरिकांच्या तसेच वाहनांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था, पार्कच्या निर्मितीनंतर रेसकोर्स व सार्वजनिक उद्यान यांची सुरळीत देखभाल यादृष्टिने आवश्यक बारीकसारीक सर्व तपशिलांची माहिती उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांनी दिली. त्यानंतर वरळीतील बिंदूमाधव ठाकरे चौक येथून मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावर प्रवेश करुन प्रकल्पाच्या कामांची पाहणी केल्यानंतर वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडण्यासाठी किनारी रस्त्याच्या मार्गिकेचे काम वेगाने व वेळेत पूर्ण होईल, असे प्रयत्न करावेत, जेणेकरुन उत्तरेकडे जाणाऱ्या वाहतुकीचाही वेग वाढेल, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रकल्पातील विहार क्षेत्र (प्रॉमिनाड), सागरी संरक्षण भिंत, सायकल ट्रॅक, पादचारी भूयारी मार्ग, हाजी अली आंतरमार्गिका तसेच उत्तरवाहिनी मार्गिकेचे काम इत्यादी ठिकाणी पायी फिरुन सर्व कामांची, प्रगतीची माहिती घेतली. त्यानंतर मरीन ड्राइव्हच्या दिशेने दक्षिणवाहिनी भूयारी मार्गातून प्रवास करताना भूयारी मार्गातील आपत्कालीन स्थितीसाठी केलेल्या उपाययोजना, अग्निशन सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरा या सर्वांची पाहणी केली. एवढेच नव्हे आपत्कालीन संपर्क यंत्रणेद्वारे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून यंत्रणा तत्परतेने कार्यरत असल्याची खातरजमा देखील त्यांनी केली. दोन्ही जुळ्या बोगद्यांना जोडणारे छेद बोगदे, त्याचप्रमाणे उत्तर दिशेच्या वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या भूयारी बोगद्याची त्यांनी पाहणी केली. प्रकल्पाची कामे वेळापत्रकाप्रमाणे पूर्णत्वास जातील, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना तसेच प्रकल्प सल्लागारांना दिल्या.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका