Join us

सिडकोची कामोठ्यात प्रतिबंधक फवारणी

By admin | Updated: November 5, 2014 04:07 IST

कामोठे वसाहतीत डेंग्यूची साथ’ हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर सिडकोचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण नोडमध्ये औषध फवारणी सुरू

कामोठे : ‘कामोठे वसाहतीत डेंग्यूची साथ’ हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर सिडकोचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण नोडमध्ये औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. पंचायत समितीचे सदस्य सखाराम पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे ही प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतली. कामोठे वसाहतीतील कचरा नियमित उचलला जात नसून, घंटागाडी कधी तरी येते तसेच नाल्याची साफसफाईही व्यवस्थित केली जात नाही. परिणामी ते ठिकठिकाणी तुंबतात. पाणी साचल्याने डासांचे प्रमाण वाढले. तसेच फवारणीही वेळेत होत नव्हती. एकीकडे स्वच्छता अभियान देशभरात राबवले जात असताना सिडको मात्र आपले कर्तव्य बजावताना दिसत नसल्याचे उघड झाले होते. परिणामी रोगराई पसरली असून वसाहतीत सुमारे गेल्या काही दिवसांत डेंग्यूचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कामोठेकरांनी सिडकोच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. सिडकोने याबाबत त्वरित उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सखाराम पाटील यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारपासून सर्व सेक्टरमध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर कचराही तातडीने उचलला गेला असल्याचे रहिवाशांनी सांगितले.(वार्ताहर)