सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई -बँका, एटीएम सेंटर आणि कॅश व्हॅनच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा एजन्सीकडून एअरगनचा वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शहरातील बँका व एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.बँकांची कोट्यवधी रुपयांची वाहतूक करणाऱ्या एजन्सीकडून सुरक्षेसाठी एअरगन वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली असून सुरक्षेचे मोठे आव्हानही उभे राहिले आहे. शहरात अनेक बँका व त्यांचे एटीएम सेंटर आहेत. त्यानुसार प्रतिदिन अनेक बँकांची कोट्यवधी रुपयांची रोकड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जाते. मात्र याकरिता नेमलेल्या एजन्सींकडून खऱ्या बंदुकीऐवजी एअरगन वापरल्या जात आहेत. एअरगन हे सुरक्षेचे शस्त्र नसतानाही त्याचा वापर होत आहे. एअरगन हे हुबेहूब ख-या बंदुकीसारखे दिसणारे परंतु पक्षी मारण्यासाठी उपयुक्त हत्यार आहे. त्यामुळे एअरगनधारक सुरक्षा रक्षक असलेल्या अशा बँक, एटीएम सेंटर अथवा कॅशव्हॅनवर लुटारूंनी हल्ला केल्यास सुरक्षा रक्षक त्यांचा सामना कसा करणार याचा प्रश्न पोलिसांना सतावत आहे.पोलिसांकडून व्यावसायिक कारणासाठी सुरक्षा रक्षक एजन्सींना शस्त्र परवाना दिला जात नाही. परंतु बँकांना मात्र हा परवाना तात्काळ दिला जातो. त्यानुसार बँकांनी शस्त्र घेवून नेमलेल्या सुरक्षा रक्षकाला पुरवणे आवश्यक आहे. परंतु शहरातील अनेक बँकांनी बेजबाबदारपणा दाखवत खाजगी सिक्युरिटी एजन्सीवर सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे. मात्र त्यांच्याकडे असलेली शस्रे खरी आहेत की खोटी याची खात्रीही बँकांकडून केली जात नसावी. त्यामुळे सिक्युरिटी एजन्सींकडून पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एअरगन वापरासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक नाही. त्यामुळे अवघ्या २ ते ५ हजार रुपयांमध्ये मिळणारी एअरगन वापरुन एजन्सीकडून संबंधित सुरक्षा रक्षकाचाही जीव धोक्यात घालत आहेत. काही वर्षांपूर्वी कोपरी येथे भरदिवसा कॅश व्हॅन लुटल्याचा प्रकार देखील घडला आहे. कॅश व्हॅन एजन्सीकडून निष्काळजीपणा होतो.
बँंका व एटीएम सेंटरची सुरक्षा धोक्यात
By admin | Updated: August 25, 2014 00:26 IST