Join us  

धमकीच्या फोननंतर सुरक्षेत वाढ, मुंबई विमानतळावर भीतीचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 5:33 AM

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला शनिवारी धमकीचा फोन आल्याने विमानतळावर भीतीचे सावट होते.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला शनिवारी धमकीचा फोन आल्याने विमानतळावर भीतीचे सावट होते. दूरध्वनीवर आलेल्या धमकीनंतर टर्मिनल- २ वरील तीन मजले रिकामे करण्यात आले. यासह विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली. दरम्यान, विमानतळाची धावपट्टी देखभालीच्या कारणामुळे शनिवारी बंद होती. त्यामुळे विमानाच्या टेक आॅफ आणि लँडिंगवर परिणाम झाला नाही.विमानतळावर धमकीचा फोन आल्याने सावधगिरी म्हणून टर्मिनल- २ च्या इमारतीचा दुसरा, तिसरा, चौथा मजला रिकामा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक व काही देशांतर्गत विमानांची वाहतूक टर्मिनल २ वरून होते. त्यामुळे येथे संशयास्पद हालचाल दिसताच तेथे सुरक्षा पथक पोहोचून गस्त घालत आहेत. नागरी हवाई सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) यांनी विमानतळ, विमाने आणि इतर हवाई कंपन्यांना सुरक्षेसंदर्भात सूचना दिल्या आहेत. टर्मिनल आणि इतर भागांत चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. प्रवाशांची आणि त्यांच्या साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. पार्किंगच्या भागात गाड्यांची तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरा, मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर आदी यंत्रणेच्या साहाय्याने सुरक्षेला बळकटी देण्यात येत आहे.सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्ली, पंजाब, गुजरात आणि राजस्थान या शहरांतील विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीच्या रेल्वे स्थानकांना आणि विमानतळाला छावणीचे स्वरूप आले आहे.>मुंबईच्या सुरक्षेत वाढ, मेट्रो प्रशासनही दक्षरस्ते, रेल्वे, मुंबई मेट्रो, समुद्र किनारपट्टी परिसरात बंदोबस्तात वाढ करत, मुंबईत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक, फोर्स वन, शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकआदींकडून शहरातील महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. मेट्रो प्रशासनही दक्ष झाले असून, सर्व स्थानकांवरही सुरक्षा वाढवली आहे.

 

टॅग्स :विमानतळ