Join us

वर्ष उलटले तरी सुरक्षारक्षकांना वेतनवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST

मुंबई : मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांच्या वेतनवाढीचा कालावधी १ जून २०२० रोजी संपुष्टात आला आहे, त्याला ...

मुंबई : मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांच्या वेतनवाढीचा कालावधी १ जून २०२० रोजी संपुष्टात आला आहे, त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरीही वेतनवाढ करण्यात आली नाही. त्यामुळे ही वेतनवाढ तत्काळ करावी, अशी मागणी सुरक्षारक्षक संघटनेने केली आहे.

माय बळीराजा सुरक्षारक्षक युनियनचे कोषाध्यक्ष मारुती झाडे म्हणाले की, सुरक्षारक्षकांमार्फत मंडळातील अधिकाऱ्यांच्या विरोधात सुरक्षारक्षक काळ्या फिती लावून जाहीर निषेध करणार आहेत. सुरक्षारक्षांचा १ जून २०२० रोजी करार संपून वेतनवाढ निश्चित करण्याची अपेक्षा सुरक्षारक्षकांना होती, पण त्याला आता एक वर्ष उलटले आहे.

कोरोनाकाळात आपल्या जीवाची बाजी लावून सर्व सुरक्षारक्षक आपली कामगिरी चोखपणे पार पाडत आहेत. तरी मंडळातील अधिकाऱ्यांना याबाबत जराही माणुसकी, आपुलकी दिसून येत नाही व जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम मंडळातील अधिकाऱ्यांकडून होत आहे. तरी मुख्यमंत्री आणि कामगारमंत्री यांना सुरक्षारक्षकांच्या वतीने विनंती करण्यात येते की, आपण सदर प्रकरणात जातीने लक्ष घालून सुरक्षारक्षकांची वेतनवाढ लवकरात लवकर मिळवून द्यावी. सुरक्षारक्षक हे कोरोनाकाळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. तरी मंडळ प्रशासनाकडून जाणीवपूर्वक सुरक्षारक्षकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याची नोंद घ्यावी व सुरक्षारक्षकांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, असेही ते म्हणाले.