Join us

तलावांवर आता सुरक्षा रक्षकांची गस्त

By admin | Updated: October 27, 2014 01:17 IST

शहरातील २४ तलावांवर महापालिकेने सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. तलावामध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबई : शहरातील २४ तलावांवर महापालिकेने सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. तलावामध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २४ तलाव असून, तब्बल २ लाख २३ हजार ६६१ चौरस मीटर क्षेत्र तलावांनी व्यापले आहे. पालिकेने तलाव व्हिजनच्या माध्यमातून अनेक तलावांचा विकास केला आहे. गणेश विसर्जनामुळे तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी अनेक ठिकाणी गॅबीयन वॉल टाकण्यात आली आहे. तलावाच्या परिसराचा विकास करण्यात आला आहे. परंतु सदर ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने तलावात बुडून लहान मुलांचा मृत्यू होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे व या परिसरामध्ये टपोरींचा वावर वाढल्यामुळे प्रत्येक तलावावर सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी दोन वर्षांपासून होऊ लागली होती. महापालिका प्रशासनाने सद्य:स्थितीमध्ये सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून महत्त्वाच्या तलावांवर दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. महापालिकेचे मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी सांगितले की, सद्य:स्थितीमध्ये दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. भविष्यात परिमंडळ स्तरावर निविदा मागवून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)