Join us
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध हत्या प्रकरणातील सुरक्षारक्षक निर्दोष

By admin | Updated: March 6, 2016 02:59 IST

मुमताज बादशाह (७८) या वृद्धेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी इमारतीचा सुरक्षारक्षक मोहम्मद चौधरी (२५) याला अटक केली असली तरी तो निर्दोष असल्याचा दावा

मुंबई : मुमताज बादशाह (७८) या वृद्धेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी इमारतीचा सुरक्षारक्षक मोहम्मद चौधरी (२५) याला अटक केली असली तरी तो निर्दोष असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांसह सोसायटीतील सदस्यांनी केला आहे. त्याला खोट्या आरोपात अडकविण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.रिजवान सोसायटीने यासंदर्भातील म्हणणे मांडण्यासाठी शनिवारी थेट पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी सोसायटीचे पदाधिकारी असिफ सुनासरा यांनी सांगितले की, मुमताज यांची हत्या झाल्यानंतर मोहम्मद चौधरी फरार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असले तरी तो फरार नव्हता, तर पोलीसच त्याला चौकशीसाठी घेऊन गेले होते. शिवाय सीसीटीव्हीमध्ये चौधरी दिसत असला तरी या घटनेनंतरचा डीव्हीआर पोलिसांकडे आहे. चौधरीवर आमचा विश्वास असून, त्याला आम्ही कामावरून काढल्याच्या वृत्तात तथ्य नाही.चौधरीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, मोहम्मदवर पोलिसांकडून चुकीचे आरोप केले जात असल्याने तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. पोलीस त्याला पकडण्यासाठी जेव्हा जम्मूत दाखल झाले तेव्हा मी स्वत: त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवाय दोन दिवसांत चौकशी करून त्याला मुक्त करू, असेही पोलिसांनी सांगितले. परंतु पोलिसांनी त्याला मुंबईत आणत आरोपी बनवले. दुसरीकडे पोलिसांनी मोहम्मद याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)