Join us

दुसऱ्या लाटेत चार महिन्यांत ६० हजारांहून अधिक कोरोनाबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:05 IST

राज्यातील आकडेवारीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या ...

राज्यातील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चार महिन्यांत ६० हजारांहून अधिक कोरोनाबळींची नोंद झाली आहे. पहिल्या लाटेत २ लाख ४८ हजार ८०२ रुग्णांची नोंद झाली हाेती, तर ५१ हजार ३६० मृत्यू झाले.

आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख १४ हजार १५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. यातील जवळपास अर्धे मृत्यू हे १५ फेब्रुवारीनंतरचे आहेत. काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे मृत्यू झाले आहेत. देशभरात होणाऱ्या काेरोना मृत्यूंपैकी २० टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. एकंदरीत भारतामध्ये आजपर्यंत झालेल्या ३.४ लाख काेरोना मृत्यूंपैकी ३० टक्के राज्यातील आहेत. गेल्या वर्षभरापासून हे प्रमाण स्थिर असल्याचे दिसत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. मुंबईत मृतांचा आकडा १५,२१६ च्या जवळपास आहे, तर पुण्यात ते १५,५९३ पेक्षा जास्त आहे.

राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, यावेळेच्या लाटेत मृत्यूंचे प्रमाण अधिक असण्यामागे विविध कारणे आहेत. त्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आल्याची नोंद आहे. तसेच, ग्रामीण भागातही संसर्गाची तीव्रता अधिक होती, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याने मृत्यू ओढावल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा तुटवडा, खाटांची उपलब्धता नसणे, उशिरा निदान या सर्व कारणांमुळे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.

पहिल्या लाटेत अनेक रुग्ण घरी क्वारंटाइन होऊन बरे झालेले दिसून आले. मात्र, दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. विषाणूत बदल झाल्याने रुग्णांना अधिक धोका झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक चिंताजनक ठरली, अशी माहिती डॉ. केदार घोसाळकर यांनी दिली.

...............................................