Join us

दुसऱ्या लाटेत घर विक्रीत ५८ टक्‍क्‍यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:06 IST

मुंबई : २०२१च्या पहिल्या तिमाहीत घर विक्रीला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत घर खरेदीत ५८ ...

मुंबई : २०२१च्या पहिल्या तिमाहीत घर विक्रीला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत घर खरेदीत ५८ टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. भारतातील प्रमुख ७ शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे घर खरेदी मध्ये ५८ टक्‍क्‍यांची घटही झाली आहे.

अनारॉक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील मुंबई महानगर प्रदेश, पुणे, बंगळुरू, दिल्ली एनसीआर, हैदराबाद, चेन्नई व कोलकाता या शहरांमध्ये या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत एकूण ५८ हजार २९० घरांची खरेदी झाली होती, तर दुसऱ्या तिमाहीत २४ हजार ५७० घरांची खरेदी झाली आहे. २०२०च्या घरखरेदीपेक्षाही खरेदी जास्त असली, तरीही सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या घर खरेदीचा दर पाहता नंतरचे तीन महिने घर खरेदी घटली आहे.

२०२०च्या मार्च महिन्यापासून कोरोनाची पहिली लाट आल्याने सर्व कामकाज ठप्प होते. यामुळे घर खरेदीलाही खीळ बसला होता. मात्र, घर खरेदीला चालना मिळावी, यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिली.

ही सवलत २०२१च्या मार्च महिन्यापर्यंत असल्याने या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, नंतरच्या तिमाहीत दुसरी लाट धडकली. त्याचप्रमाणे, मुद्रांक शुल्काची सवलतही नसल्याने घर खरेदीत घट झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील प्रमुख शहरांमध्ये नवे प्रकल्प बाजारात येण्यातही घट झाली आहे. या वर्षी सुरुवातीच्या तीन महिन्यांत भारतात ६२ हजार १३० नवीन हाउसिंग प्रकल्प बाजारात आले, तर दुसऱ्या तिमाहीत ३६ हजार २६० प्रकल्प बाजारात आले. यामुळे दुसऱ्या लाटेचा नवीन प्रकल्प बाजारात येण्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.