Join us  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढले ज्येष्ठांचे बाधित होण्याचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 5:20 AM

आराेग्य विभागाची माहिती; १८ टक्के ज्येष्ठांना कोरोनाची लागण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २०२० मध्ये साठहून अधिक वय असणाऱ्या ३.२३ लाख ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. फेब्रुवारीत हे प्रमाण १६.४ टक्क्यांवर आले, तर मार्चमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढल्यानंतर हे प्रमाण तब्बल १८ टक्क्यांवर गेल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

२०२० साली ५७.५१ टक्के ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यंदाच्या वर्षात हे प्रमाण वाढून ६४.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. १ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत एकूण २ हजार २४३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यातील १ हजार ४४९ रुग्ण ज्येष्ठ नागरिक गटातील आहेत. राज्यात फेब्रुवारी महिन्यात ३३ हजार ३०१ आणि मार्चमध्ये २३ हजार ७२० ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. राज्यातील एकूण कोरोना बळींत या वयोगटात सर्वाधिक मृत्यूंचे प्रमाण आहे. त्यात उच्चरक्तदाब असणाऱ्या ४५ टक्के, तर मधुमेह असणाऱ्या ४० टक्के रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.

राज्याच्या कोरोना मृत्यूविश्लेषण टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, कोरोनाची लागण तरुणांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांनीही होत आहे. मात्र, सहव्याधी असणाऱ्या गटात या आजारामुळे गुंतागुंत निर्माण होताना दिसत आहे, तसेच लसीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या केंद्रांवर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याची चिंता आहे. कारण बऱ्याच केंद्रांवर गर्दी आणि मास्क वापरण्याविषयी बेफिकरी दिसून येत आहे.

११ टक्के किशोरवयीन मुला-मुलींना लागणnआराेग्य विभागाच्या माहितीनुसार, ३१ ते ४० वयोगटातील २१ टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्याखालोखाल ४१-५० वयोगटातील काेराेना संसर्गाचे प्रमाण १८.३ टक्के, तर २१ ते ३० वयोगटात हे प्रमाण १६.४ टक्के आहे. n२० पेक्षा कमी वय असणाऱ्या ११ टक्के किशोरवयीन मुला-मुलींना कोरोनाची लागण झाली आहे. मागील वर्षी २१ ते ५० वयोगटातील १८.४ टक्के रुग्णांचा काेराेनामुळे मृत्यू झाला होता, यंदा १ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान हे प्रमाण १४.३६ टक्के इतके आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या