Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेकंड लीड: कोविड खर्चासाठी चारशे कोटी देण्यास विरोधी पक्षाचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:08 IST

मुंबई : काँगेस नेत्यांनी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत नुकतेच दिले. त्यामुळे राज्यात सत्तेत असले तरी महापालिकेतील ...

मुंबई : काँगेस नेत्यांनी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत नुकतेच दिले. त्यामुळे राज्यात सत्तेत असले तरी महापालिकेतील विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेऊ लागले आहेत. त्यानुसार कोविड १९साठी आणखी चारशे कोटी रुपये निधी खर्च करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. आयुक्त वर्षा बंगल्यावरून पालिकेचा कारभार हाकतात, असा आरोपही समाजवादी पक्षाने केला आहे. यामुळे बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत १६३२.६४ कोटी रुपये आकस्मिक निधीतून पालिकेने खर्च केले आहेत. मात्र कोरोनाविरुध्द लढा अद्याप सुरूच असल्याने मार्च २०२१ पर्यंत आणखी चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या आकस्मिक निधीत केवळ २९.९३ कोटी रुपये शिल्लक असल्याने वार्ताळ्यामधून हा निधी आकस्मिक निधीत वर्ग करण्याची विनंती प्रशासनाने स्थायी समितीला केली आहे. मात्र यापूर्वीच्या खर्चाचा हिशेब दिल्याशिवाय चारशे कोटींचा प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला आहे.

कोविड खर्चासंबंधीचे १२५ प्रस्ताव सत्ताधारी पक्षानेच अपुरी माहिती व घोटाळ्याच्या आरोपांमुळे प्रशासनाकडे परत पाठवले होते. बीकेसीमधील कोविड केंद्राचे पैसे आम्ही देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ५२ कोटी देण्याची तयारी दाखवली आहे. ही पालिकेच्या पैशांची लूट असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. त्यामुळे पुन्हा ४०० कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला आपला कडाडून विरोध असल्याचे समाजवादीचे गटनेते रईस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता राखी जाधव यांनी सांगितले.

वर्षा बंगल्यावरून चालतो पालिकेचा कारभार....

आयुक्त हे पालिकेत कुणालाच भेटत नाहीत. ते नेहमीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर असतात. त्यामुळे वर्षा बंगल्यावरच त्यांना एक दालन द्या, जेणेकरून पालिकेचा कारभार ते तिथून करू शकतील, असा टोला समाजवादीचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी लगावला.