Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या वर्षातील दुसऱ्यांदा कोरोनाबाधितांची उच्चांकी संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST

यंदाच्या वर्षातील दुसऱ्यांदा कोरोनाबाधितांची उच्चांकी संख्यादिवसभरात ४०९२ रुग्णांची नोंद, ४० मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या ...

यंदाच्या वर्षातील दुसऱ्यांदा कोरोनाबाधितांची उच्चांकी संख्या

दिवसभरात ४०९२ रुग्णांची नोंद, ४० मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा वाढता आलेख रविवारी कायम राहिला. यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा नव्या रुग्णांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. दिवसभरात ४ हजार ९२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी फक्त ६ जानेवारी रोजी ४,६८२ रुग्णांची नोंद झाली होती.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात ४ हजार ९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनानेबाधित झालेल्यांची एकूण संख्या २० लाख ६४ हजार २७८ झाली आहे. याशिवाय, बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट पाहायला मिळाली. दिवसभरात केवळ १ हजार ३५५ रुग्ण बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ७५ हजार ६०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात ३६ हजार ६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यभरात आज ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्युदर २.५ टक्के एवढा आहे. आतापर्यंत ५१ हजार ५२९ लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख २१ हजार ६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ६४ हजार २७८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार २४३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ७४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.