कळंबोली : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्याकरिता शिक्षण विभाग ४ जुलैला विविध शासकीय यंत्रणा त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पनवेल परिसरात विशेष मोहीम राबवणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे बैठका पार पडल्या आहेत. या मोहिमेंतर्गत शाळाबाह्य मुलांची ओळख पटवून त्यांना शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एकही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सर्वशिक्षा अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर मुलांनी शाळेत यावे याकरिता मोफत गणवेश, पुस्तके दिली जातात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांवर फारसा बोजा येवू नये यासाठी शालेय पोषण आहार सुध्दा दिला जातो. असे असतानाही शेतमजूर, बिगारी काम करणारे, वीटभट्टी कामगार, कचरा वेचक यांची मुले शाळेत जात नाहीत. ज्या मुलांचे खेळण्या -बागडण्याचे, शिकण्याचे वय आहे त्यांना आई -वडील आपल्याबरोबर कामाला जुंपतात. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी होत नाही. अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. पनवेल तालुक्यातही गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून ही शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत त्यांनी मागील आठवड्यात नवीन पनवेल येथील झोपडपट्टीतील आठ मुले शोधून त्यांना आदईतील शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यानुसार ४ जुलैला पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे व खारघर येथे झोपड्या करून राहणारी कुटुंबे, वीटभट्ट्या, शेतात मजुरी करणारे मजूर, कचरा वेचणाऱ्या महिला, आदिवासी वाड्या आणि पाड्यावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता इतर शासकीय यंत्रणांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्थांनाही बरोबर घेवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. (वार्ताहर) शासनाच्या वतीने राज्यभर ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यात अगोदरच हे अभियान हाती घेवून काही शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश दिला. ४ जुलैला जिकडे मुले सापडतील त्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना गणवेश, पुस्तकांबरोबरच शाळेत जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. - नवनाथ साबळे, गटशिक्षण अधिकारी, पनवेल
शासन घेणार शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध
By admin | Updated: June 29, 2015 22:36 IST