Join us

वर्तमानपत्रावरील क्रमांकावरून मारेकऱ्याचा शोध

By admin | Updated: December 21, 2015 09:31 IST

बलात्काराला प्रतिकार केल्याने, तरुणीच्या अंगावर रॉकेल ओतून तिची पेटवून हत्या करणाऱ्या महंमद अजमल सिद्धिकी याला मालवणी पोलिसांनी अटक केली

मुंबई: बलात्काराला प्रतिकार केल्याने, तरुणीच्या अंगावर रॉकेल ओतून तिची पेटवून हत्या करणाऱ्या महंमद अजमल सिद्धिकी (वय २८, रा. गेट नं.७, मालवणी, मालाड) याला मालवणी पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी मिळालेल्या एका वर्तमानपत्रावर लिहिलेल्या मोबाइल क्रमांकावरून तो तावडीत सापडला. त्याने रॉकेल ओतून पेटविलेल्या शमा परवीन जावेद शेख (२३) या तरुणीचा शुक्रवारी मृत्यू झाला.गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शमाच्या घरी कोणी नसताना अजमल घरात गेला. तेव्हा तो बलात्काराचा प्रयत्न करू लागल्याने, तिने प्रतिकार करत कशीबशी सुटका करून घेतली. घराबाहेर पळत असताना अजमलने घरातील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. शेजाऱ्यांनी अत्यवस्थ शमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला. तिच्या खोलीतील कचऱ्याच्या बादलीत एक वर्तमानपत्र मिळाले होते. पेपरवर एका बाजूला एक मोबाइल नंबर लिहिलेला होता. पोलिसांनी त्या क्रमांकाचा शोध घेतला असता, तो अजमल सिद्धीकीचा असल्याचे समोर आले. अजमलला ताब्यात घेऊन विचारले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अजमलला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवल्याचे निरीक्षक लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)