Join us  

चक्क भुताच्या शोधात ‘तो’ पोहोचला आमदार निवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 6:15 AM

सोशल मीडियावर हाँटेड प्लेसेसचा शोध घेत, बंगळुरूच्या तरुणाने मुंबई गाठली. भुताच्या शोधात तो थेट कुलाब्याच्या आमदार निवासात शिरला. अंधारात भुताचा शोध सुरू असताना दोन सुरक्षा रक्षक तेथे धडकले.

मुंबई : सोशल मीडियावर हाँटेड प्लेसेसचा शोध घेत, बंगळुरूच्या तरुणाने मुंबई गाठली. भुताच्या शोधात तो थेट कुलाब्याच्या आमदार निवासात शिरला. अंधारात भुताचा शोध सुरू असताना दोन सुरक्षा रक्षक तेथे धडकले. त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सुरक्षा रक्षक नसून तेही ‘भूत’ असून आपल्याला पळविण्यासाठी आल्याचे तरुणाला वाटले. त्याने सारी शक्ती एकवटून दोघांनाही मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही सुरक्षा रक्षकांनी त्याला आवरत पोलिसांच्या ताब्यात दिले.अँड्रिव्ह बेन्जामिन शिमश्या (१८) असे या प्रतापी मुलाचे नाव आहे. मूळचा बंगळुरूचा तो रहिवासी आहे. त्याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासंदर्भातील अभ्यासक्रमाची माहिती घेण्यासाठी तो मुंबईत आला. पेडर रोड परिसरातील मित्राकडे त्याने काही दिवसांसाठी बस्तान मांडले होते. त्याला ‘हाँटेड प्लेसेस’ पाहण्याचा भलताच छंद जडला होता. त्याने मित्रांकडून मुंबईतल्या हाँटेड प्लेसेसबद्दल ऐकले होते. त्यातच त्याच्या कानावर कुलाबा येथील ‘मॅजेस्टिक’ या आमदार निवासाची माहिती मिळाली. या जागेबाबात त्याला कुतूहल निर्माण झाले. आपण कुणाला घाबरत नसून जगाच्या कुठल्याही ठिकाणी जाऊ शकतो. आपल्याला कोणी काही करूशकत नाही, हे दाखविण्यासाठी त्याने तेथे जाऊन भुताचा शोध घेत, आपलाही एक व्हिडीओ व्हायरल करण्याचे ठरविले. सद्यस्थितीत मॅजेस्टिक आमदार निवासाचे पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने, येथे नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.ठरल्याप्रमाणे सोमवारी रात्री १०च्या ठोक्याला शिमश्या तेथे धडकला. त्याने दरवाजाचे हूक तोडून आत प्रवेश केला. भुताचा शोध तो घेऊ लागला. भूत दिसताच त्याच्याशी दोन हात करायचे आणि शूरतेचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याचे स्वप्न तो रंगवू लागला. अंधारात तो भुतांना बोलावत असताना, आतील हालचालींची चाहूल तेथील सुरक्षा रक्षकांना लागली. सलाउद्दिन पिंजारी, जितेंद्र कदम या सुरक्षा रक्षकांनी आत प्रवेश केला. दोघांनीही त्याला पकडले. भुतांनीच या दोघांना आपल्याला पळविण्यासाठी पाठविल्याचे शिमश्याला वाटले, म्हणून त्याने दोघांनाही मारहाण सुरू केली. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. मात्र, दोन्हीही सुरक्षा रक्षकांनी त्याच्यावर आवर घालत पोलिसांना याबाबत कळविले. घटनेची वर्दी लागताच कुलाबा पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी शिमश्यासह पोलीस ठाणे गाठले.अदखलपात्र गुन्हापोलीस चौकशीत आपण फक्त कुतूहल म्हणून आमदार निवासात जाण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. तपासात तो कुठल्याही चुकीच्या उद्देशाने आत शिरला नसल्याचे निष्पन्न झाले. तो हुशार आणि चांगला मुलगा आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली.

टॅग्स :मुंबईआमदार