विक्रोळी : चहुबाजूंनी उखडलेले जॉगिंग ट्रॅक, त्यात उगवलेले गवत आणि अर्धवट तुटलेली खेळणी, डासांचा वाढता प्रादुर्भाव, रात्री-अपरात्री दारूड्यांची वर्दळ, अनधिकृत पार्किंग अशी अवस्था आहे विक्रोळीतील टागोर नगर येथील शाहू महाराज मैदानाची. येथे खरेच खेळाचे मैदान आहे का, असा प्रश्न स्वत:लाच विचारत बच्चेकंपनी या मैदानाकडे पाठ फिरवत आहे. टागोर नगर क्रमांक ७ येथे चाळीस वर्षे जुने शाहू महाराज मैदान आहे. नागरिकांच्या मागणीखातर या परिसरात हे मैदान तयार करण्यात आले होते. मुळात डोंगराळ पट्ट्यात असलेल्या उद्यानाचा लाभ हजारो नागरिक घेत होते. कालांतराने या मैदानात चारही बाजूंनी ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग टॅ्रक तयार करण्यात आला. बच्चेकंपनीसाठी खेळण्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र मैदानाची योग्य देखभाल न झाल्याने सध्या येथे उद्यान होते का, असा प्रश्न पडतो. अशात क्रिकेटप्रेमी, खेळाडू यांंचेही हाल होत असल्याची ओरड तरुणांकडून होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप समाजसेवक वारीस शेख यांनी केला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी)
बच्चेकंपनी मैदानाच्या शोधात
By admin | Updated: August 13, 2014 02:03 IST