Join us  

अप्पर महासंचालकांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:48 AM

‘व्हीआरएस’ला मुख्यमंत्र्यांची मंजुरी : सामाजिक कार्यात सक्रिय होणार

जमीर काझी ।मुंबई : राज्य पोलीस दलातील अत्यंत कार्यक्षम व प्रामाणिक आयपीएस अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या अप्पर महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची २८ वर्षांची सेवा अखेर संपुष्टात आली आहे. स्वेच्छानिवृत्तीसाठी (व्हीआरएस) केलेल्या विनंतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. केंद्रीय गृहविभागाकडे त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, यापुढे आपण हैदराबाद येथे सामाजिक कार्यात पूर्ण वेळ सक्रिय राहणार आहेत. लीड इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते कार्यरत राहणार आहेत.गेल्या दोन वर्षांपासून पोलीस मुख्यालयात नियोजन व तरतूद विभागाची जबाबदारी सांभाळत असलेल्या लक्ष्मीनारायन यांनी, तब्बल सात वर्षांची सेवा शिल्लक असताना गेल्या महिन्यात स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. तेव्हा ते तेलंगणा राज्यातील राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, तूर्तास तरी याबाबत त्यांनी ‘वेट अँड वॉच’ हे धोरण स्वीकारले आहे.५३ वर्षांचे लक्ष्मीनारायणहे मूळचे तेलंगणा हैदराबाद येथील असून, १९९०च्या आयपीएस बॅचचे ते अधिकारी आहेत. अधीक्षक पदापासून जिथे-जिथे काम केले, त्या ठिकाणी कामाचा ठसा त्यांनी उमटविला. कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार काम करणारे,तसेच कुठलाही मुलाहिजा न ठेवता गैरकृत्य व भ्रष्टाचार करणाऱ्यांवर बेधडकपणे कारवाई करणारे अधिकारी म्हणूनदेखील त्यांची ख्याती आहे.अडीच वर्षांपूर्वी ठाण्याच्या सहआयुक्तपदावरून ते बढतीवर पोलीस मुख्यालयात दाखल झाले होते. अनेक वादग्रस्त अधिकारी केडर पोस्टवर कायम असताना, लक्ष्मीनारायण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाºयाला ‘साइड पोस्टिंग’वर ठेवल्याबाबत पोलीस वर्तुळात नाराजीचा सूर होता.अखेर मार्चमध्ये वैयक्तिक कारण दर्शवित, त्यांनी ‘व्हीआरएस’साठी अर्ज करत सेवेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला....यामुळे स्वेच्छानिवृत्तीचा निर्णयसात वर्षांची सेवा शिल्लक असताना राजीनामा दिलेल्या लक्ष्मीनारायण हे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे ग्रामीण विकास विभागात काम करण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी सर्व आवश्यक अटींची पूर्तता त्यांनी केली होती. मात्र, केवळ आश्वासनावर बोळवण करीत, त्या पदावर त्यांच्यापेक्षा दुय्यम असलेल्या अधिकाºयाची पंतप्रधान कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मीनारायण यांनी स्वेच्छानिवृती घेतल्याची चर्चा आयपीएस वर्तुळात आहे.‘सध्या नो पॉलिटिक्स’स्वेच्छानिवृत्ती मंजूर झाल्याबाबत आपल्याला नुकतेच कळविण्यात आले आहे. राजकारण प्रवेशाबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. पूर्ण वेळ सामाजिक कार्यात सक्रिय राहणार आहे. ग्रामीण विकास, शिक्षण या क्षेत्रांत काम करण्यासाठी मोठी संधी आहे.- व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण,माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी.

टॅग्स :महाराष्ट्र