Join us  

अंबानींच्या निवासस्थानाबाहेर पार्क केलेली स्कॉर्पिओ चोरीची; उड्डाणपुलाखालून पळविल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 12:17 AM

काचेवरच्या क्रमांकावरून पटली ओळख

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओचा चेसिस क्रमांक आणि इंजीन क्रमांक घासून काढण्यात आला होता. मात्र, वाहन जुने असल्यामुळे काचेवर असलेल्या क्रमांकावरून तिची ओळख पटली. तपासात ती कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केल्याची माहिती समोर आली. याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे परिसरात राहणारे हिरेन मनसुख यांची ही स्कॉर्पिओ आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे कार बरेच दिवस बंद होती. दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी ऑपेरा हाउस येथे काम असल्याने त्यांनी कार दुरुस्त करून घेतली. दुपारच्या सुमारास ऐरोली ब्रिजपर्यंत पोहोचताच कारचे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे तेथीलच सर्विस रोडवर ती पार्क करून ते पुढे गेले. १८ फेब्रुवारी रोजी कार पार्क केलेल्या ठिकाणी गेल्यावर कार तेथे नसल्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याचे मनसुख यांनी सांगितले. शुक्रवारी वाहिन्यांवरील बातम्या पाहून कारबाबत समजल्याचे मनसुख यांनी सांगितले.

कार मालकाला घेतले ताब्यात

स्कॉर्पिओ जुनी असल्यामुळे जुन्या वाहनाच्या काचेवरील कोपऱ्यात वाहनाचा क्रमांक टाकण्यात आला होता. आरोपींनी वाहनाची ओळख पटू नये म्हणून कारचा चेसिस आणि इंजीन क्रमांक घासला होता. पण, काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली.  तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी रात्री उशिरा मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे.

सीसीटीव्ही फुटेजसह घटनाक्रमानुसार शहानिशा

हिरेन मनसुख यांनी सांगितलेल्या घटनाक्रमाबाबत पोलीस शहानिशा करीत आहेत. सीसीटीव्ही फूटेजद्वारे ते सांगितलेल्या ठिकाणी गेले होते की नाही याबाबत चौकशी सुरू आहे. शुक्रवारीही त्यांच्याकडे चौकशी सुरू होती.

प्राथमिक तपासानुसार हेतू घाबरविण्याचा; चालकाचा शाेध सुरू

राष्ट्रीय तपास यंत्रणाही याचा समांतर तपास करत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला आहे. प्राथमिक तपासात घाबरवण्याच्या हेतूने हा प्रताप केल्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली. यामागचे गूढ उकलण्यासाठी इनोव्हा चालकाचा शाेध लागणे गरजेचे असून त्या दिशेने पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानीमुंबई पोलीस