Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर पार्क केलेली स्कॉर्पिओ चोरीची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:07 IST

काचेवरच्या क्रमांकावरून पटली कारची ओळखअंबानींच्या निवासस्थानाबाहेर पार्क केलेली स्कॉर्पिओ चोरीची!काचेवरच्या क्रमांकावरून पटली ओळखलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

काचेवरच्या क्रमांकावरून पटली कारची ओळख

अंबानींच्या निवासस्थानाबाहेर पार्क केलेली स्कॉर्पिओ चोरीची!

काचेवरच्या क्रमांकावरून पटली ओळख

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओचा चेसिस क्रमांक आणि इंजीन क्रमांक घासून काढण्यात आला होता. मात्र, वाहन जुने असल्यामुळे काचेवर असलेल्या क्रमांकावरून तिची ओळख पटली. तपासात ती कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केल्याची माहिती समोर आली. याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे परिसरात राहणारे हिरेन मनसुख यांची ही स्कॉर्पिओ आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे कार बरेच दिवस बंद होती. दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी ऑपेरा हाउस येथे काम असल्याने त्यांनी कार दुरुस्त करून घेतली. दुपारच्या सुमारास ऐरोली ब्रिजपर्यंत पोहोचताच कारचे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे तेथीलच सर्विस रोडवर ती पार्क करून ते पुढे गेले. १८ फेब्रुवारी रोजी कार पार्क केलेल्या ठिकाणी गेल्यावर कार तेथे नसल्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याचे मनसुख यांनी सांगितले. शुक्रवारी वाहिन्यांवरील बातम्या पाहून कारबाबत समजल्याचे मनसुख यांनी सांगितले.

* कार मालकाला घेतले ताब्यात

स्कॉर्पिओ जुनी असल्यामुळे जुन्या वाहनाच्या काचेवरील कोपऱ्यात वाहनाचा क्रमांक टाकण्यात आला होता. आरोपींनी वाहनाची ओळख पटू नये म्हणून कारचा चेसिस आणि इंजीन क्रमांक घासला होता. पण, काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली. तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी रात्री उशिरा मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे.

* मिळालेल्या घटनाक्रमानुसार शहानिशा

हिरेन मनसुख यांनी सांगितलेल्या घटनाक्रमाबाबत पोलीस शहानिशा करीत आहेत. सीसीटीव्ही फूटेजद्वारे ते सांगितलेल्या ठिकाणी गेले होते की नाही याबाबत चौकशी सुरू आहे. शुक्रवारीही त्यांच्याकडे चौकशी सुरू होती.

* कट पूर्वनियोजित; स्कॉर्पियोचा क्रमांक निघाला नीता अंबानी यांच्या लीड कारचा

संशयास्पदरीत्या आढळलेल्या स्कॉर्पियोवर वापरण्यात आलेला क्रमांक नीता अंबानी यांच्या ताफ्यातील लीड कार असलेल्या रेंज रोव्हर वाहनाचा आहे. त्याशिवाय रिलायन्स ग्रुपसंबंधित आणखी दोन बनावट नंबर प्लेट्ससह चार प्लेट कारमधून ताब्यात घेतल्या आहे. यात अन्य दोन वाहन क्रमांक ठाणे आणि मुंबईतील रहिवाशांची आहेत. आरोपींनी कार चोरीच्या घटनेआधीपासून रेकी करत त्यांच्या वाहनांची पाहणी केली. त्यानंतर वाहन चोरी केल्यानंतर वाहन तेथे पार्क केले. आरोपींची ॲन्टालिया येथील निवासस्थानाबाहेरील स्कॉर्पियो जप्त केली तेव्हा ती क्लॅम्प केलेल्या अवस्थेत होती.

...........................

जिलेटीन काड्यांचे नागपूर कनेक्शन!

मुंबई : स्कॉर्पिओमधून जप्त केलेल्या जिलेटीन काड्यांवर नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे नाव आहे. त्यामुळे जिलेटीन त्या भागातून आणल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुट्या २० जिलेटीन काड्या असल्यामुळे त्याची माहिती मिळणे अवघड आहे. त्यांचे वजन अडीच किलो होते. याचा स्कॉर्पिओमधून स्फोट घडवून आणला असता तर जवळपास ८ ते १० किलोमीटर अंतरावर पडसाद उमटले असते, अशी शक्यताही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविली. अंँटालियाच्या प्रवेशद्वारालाही याचा फटका बसला असता, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

..................