Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिक नवनिर्मितीचा प्रवास उलगडला !

By admin | Updated: January 8, 2015 02:15 IST

नोबेल पारितोषिक विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जॉन वॉरन यांनी वेलिंगकर स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुंबई : नोबेल पारितोषिक विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जॉन वॉरन यांनी वेलिंगकर स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हेलिकोबॅक्टरच्या संशोधन प्रक्रियेवर प्रकाशझोत टाकत डॉ. वॉरन यांनी वैज्ञानिक संशोधनातील सर्जनशीलता व नवनिर्मितीचा प्रवास विद्यार्थ्यांपुढे उलगडला. डॉ. वारॅन यांनी पॅथॉलॉजीतील संशोधनावर लक्ष केंद्रित करीत ‘गॅस्ट्रिक आणि पेप्टिक अल्सर्स’वरील संशोधन हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय ठेवले. ‘हेलिकोबॅक्टर पायलोरी’ यावरचे त्यांचे मूलभूत संशोधन पोटाचे विकार केवळ बरे करण्यासाठी नव्हे, तर पुनरावृत्ती होऊन नये म्हणून विविध उपचार पद्धती शोधून काढण्यात मार्गदर्शक ठरले. त्यामुळे या तपस्वी शास्त्रज्ञाला पाहणे, त्यांचे विचार ऐकणे ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच ठरली.ज्या काळात मी संशोधनाला सुरुवात केली. त्या काळात विज्ञान, तंत्रज्ञान खूप प्रगत झालेले नव्हते. माणसाच्या शरीरात, विशेषत: पोटात बॅक्टेरिया जगू शकतील, त्यासाठी बायोप्सीद्वारा संशोधन करण्याची पद्धत प्रचलित नव्हती. कारण मुळातच गॅसट्रायटिस आणि अल्सर्सबद्दल वैज्ञानिक जगतात जागरूकता नव्हती. पण मी आणि माझे सहकारी प्रयत्न करीत राहिलो आणि दीर्घकालीन प्रयत्नानंतर बॅक्टेरियाचा हा नवा प्रकार शोधून काढण्यात आम्ही यश मिळवले, अशा शब्दांत डॉ. वॉरन यांनी वैज्ञानिक प्रवास उलगडत विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले.जगाचे नेतृत्व करू शकणारे सुजाण, सुंस्कृत ‘सिटीजन लीडर्स’ प्रशिक्षित करणे, ही वी-स्कूलची जबाबदारी आहे. म्हणून केवळ औद्योगिक व शिक्षण क्षेत्रातल्याच नव्हे, तर तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक, कला-सांस्कृतिक क्षेत्रातल्या दिग्गजांबरोबर समाजाच्या तळागाळात कार्यरत असणारे कार्यकर्ते अशा व्यक्तींना आवर्जून आमंत्रित करण्यात येते. त्यांचे विचार व अनुभव ऐकण्यातून विद्यार्थ्यांच्या विचारांना नवे धुमारे फुटतात व ते अधिक संवेदनशील होत नव्या ध्येयाकडे वळतात. डॉ.वॉरन यांच्यासारख्या मानवी आयुष्य अधिक निरामय करण्यासाठी आयुष्य समर्पित केलेल्या संशोधकाचे विचार ऐकणे हा संस्मरणीय अनुभव होता, असे वेलिंगकर स्कूलचे समूह संचालक डॉ. उदय साळुंखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)