ठाणे : विद्याप्रसारक मंडळाच्या सौ. आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी बिजिंग (चीन) येथे सादर केलेल्या दोन विज्ञान प्रकल्पांना तिसरे पारितोषिक मिळाले आहे. २२ ते २६ आॅगस्ट दरम्यान झालेल्या २९ व्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत या शाळेचे चार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. बिजिंग येथे झालेल्या ‘कास्टीक’ अर्थात चायना अडोलसेंट सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कंन्टेस्ट या स्पर्धेत जगभरातील १५ देशांमधील १९ प्रकल्पांचे सादरीकरण झाले होते. सानिका जोशी आणि श्रुती कुलकर्णी या दोन विद्यार्थ्यांनी हायड्रो पॉवर कार चे तर ओंकार वरुडकर आणि तनिशा महाजन यांनी डायनॅमिक वॉटर सेव्हरचे सादरीकरण केले. या प्रदर्शनाला चीनच्या उपराष्ट्राध्यक्षांनीही भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनीही ठाण्याच्या या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. या प्रदर्शनासाठी टीम लीडर डॉ. विजय बेडेकर आणि अॅकॅडॅमिक लीडर डॉ. सुधाकर आगारकर यांनी मार्गदर्शन केले. यापूर्वीही या शाळेने सात वेळा आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळविल्याचे शाळा अधिष्ठाता कालिंदी कोल्हटकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
विज्ञान प्रकल्प चीनमध्ये सरस
By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST