Join us
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलनंतरच शाळा सुरू व्हाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून भारतात सर्वात प्रथम शाळा बंद करण्यात आल्या. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून भारतात सर्वात प्रथम शाळा बंद करण्यात आल्या. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत गेल्याने संपूर्ण वर्षभर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात शिक्षणात खंड पडू नये यासाठी शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणदेखील सुरू झाले. तरीही सत्तर टक्के पालकांना एप्रिलनंतर शाळा सुरू व्हाव्यात असे वाटते, लोकल सर्कल्सच्या वतीने एक सर्व्हे करण्यात आला आहे. त्याद्वारे हे स्पष्ट झाले आहे.

या सर्वेक्षणात शाळा सुरू करण्याबाबत पालकांची मते जाणून घेण्यात आली. तसेच लस उपलब्ध झाल्यास ती विद्यार्थ्यांना टोचून घेणार का, याबाबतदेखील पालकांची मते नोंदविण्यात आली. यात भारतातील विविध राज्यांमधील २२४ जिल्ह्यातील १९ हजारपेक्षा जास्त पालकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये ६९% पालकांनी शाळा २०२१च्या एप्रिलनंतर सुरू व्हाव्यात असे म्हटले.

लोकल सर्कल्सने सप्टेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ३४% पालक एप्रिलनंतर शाळा सुरू करण्याच्या बाजूने होते. आता ती संख्या दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे. तर २३% पालकांनी शाळा जानेवारी महिन्यातच सुरू व्हाव्यात असे म्हटले. या सर्वेक्षणात शालेय मुलांसाठी लस उपलब्ध करून दिल्यास आपण ती आपल्या मुलांना देण्याचा विचार कराल का, असा प्रश्न पालकांना विचारण्यात आला. यावेळी २६% टक्के पालकांनी लस उपलब्ध झाल्यास ती मुलांना टोचून घेणार असे म्हटले. यावेळी १२% पालकांनी मुलांना लस देण्यास नकार दिला. तर उर्वरित ५६% पालकांनी लसीकरणाचे तीन महिने वाट बघून निर्णय घेऊ असे सांगितले.

लसीकरणाबाबत प्रोत्साहित करा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अलीकडेच शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात सामाजिक अंतर राखणे, हात धुणे, स्वच्छता, हवेशीर आसन व्यवस्था अशा अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. तसेच शिक्षकांना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना लसीकरणाबाबत प्रोत्साहित करण्याचेदेखील म्हटले आहे.