Join us  

शाळेत येताच अभ्यास नको! शिक्षण, बालरोगतज्ज्ञांचे मत; सोमवारपासून पुन्हा किलबिलाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 8:44 AM

शिक्षण विभागाने शाळांना अभ्यासक्रम, परीक्षांचे वेळापत्रक, शाळांची वेळ, पुढील शैक्षणिक वर्षाचा आराखडा यातून सूट देण्याचे निर्देश द्यायला हवेत, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे नव्हे तर बालरोगतज्ज्ञही व्यक्त करीत आहेत. 

- सीमा महांगडे मुंबई : सलग दोन वर्षाहून अधिक काळ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी शिक्षण प्रक्रिया खंडित झाली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा विद्यार्थी पुन्हा शिक्षणप्रवाहात येणार आहेत तेव्हा त्यांना साचेबद्ध शैक्षणिक वेळापत्रकात न बांधता त्यांना केवळ मिळेल ते शिक्षण आत्मसात करण्याची संधी द्यायला हवी, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शिक्षण विभागाने शाळांना अभ्यासक्रम, परीक्षांचे वेळापत्रक, शाळांची वेळ, पुढील शैक्षणिक वर्षाचा आराखडा यातून सूट देण्याचे निर्देश द्यायला हवेत, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे नव्हे तर बालरोगतज्ज्ञही व्यक्त करीत आहेत. शाळा सुरू होताना विद्यार्थी वावरणाऱ्या परिसराची स्वच्छता, सुरक्षाविषयक काळजी यात शाळा आणि पालकांनी हलगर्जीपणा करणे योग्य नाही हेही तितकेच महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ डॉ. मधुरा फडके यांनी दिली. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांवर लगेचच परीक्षांचे ओझे किंवा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान समोर न ठेवता त्यांचे भावनिक व शैक्षणिक समुदेशन आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांची बुद्धी, मन आणि शरीर यांच्यात समन्वय साधून त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणले तरच त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघू शकते असे त्यांनी अधोरेखित केले. कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील किंवा काहींनी तर स्वतःशी निगडित अनेक समस्यांचा सामना केलेला असू शकतो, त्यामुळे त्यांना त्या जगातून बाहेर आणून पुन्हा शिक्षण हक्काच्या दुनियेत रममाण करणे हे शिक्षक आणि पालकांचे प्रथम उद्दिष्ट असायला हवे. यासाठी शिक्षक आणि पालक दोघांना प्रचंड मेहनत आणि संयमाची आवश्यकता असल्याचे डॉ. फडके यांनी स्पष्ट केले. दोन वर्षे मुले ऑनलाइन शिकत असल्याने त्यांना आधी शाळेत रुळू द्या असेही सांगण्यात आले. त्यांना मोकळे होऊ द्या असेही तज्ज्ञांचे मत आहे.शिक्षण विभागाकडे लक्षशाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात येण्यासाठी शिक्षण विभाग काय नियोजन करणार? काय आराखडा आखणार याकडे शाळा व्यवस्थापन, शिक्षणतज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आणि परीक्षांचा ससेमिरा विद्यार्थ्यांच्या पाठी न लावता त्यात लवचिकता आणण्याची गरज आहे. त्या निमित्ताने रोजच्या शाळांच्या वेळा, सुट्ट्या, परीक्षांचा कालावधी, मूल्यांकनाच्या पद्धती या साऱ्यामधून बाहेर पडून विद्यार्थी मोकळेपणाने शिकू शकतील अशा अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे. -भाऊसाहेब चासकर, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या