मुंबई : शाळेतून परतत असताना चार तरुणांनी 1क् वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना घाटकोपर येथे घडली आहे. याबाबत टिळकनगर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली असून, दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत ही पीडित मुलगी आई-वडिलांसोबत राहत असून, चेंबूरमधील एका खासगी शाळेत ती पाचव्या इयत्तेत शिकते. शुक्रवारी सायंकाळी ती घरी जात असताना शाळेला लागूनच असलेल्या मैदानात ती गेली होती. शाळा आणि आणि महाविद्यालयाचे एकच मैदान असल्याने या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण सुद्धा येत असतात. मुलगी एकटीच असल्याचे पाहून दोन अनोळखी तरुणांनी चॉकलेटचे आमिष दाखवत तिला एका निर्जन ठिकाणी नेले. या ठिकाणी आरोपींनी या मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर महाविद्यालयीन तरुणांनी देखील या मुलीसोबत अश्लील वर्तन केले. तसेच याबाबत कुठेही वाच्यता करू नको, अशी धमकी देखील त्यांच्याकडून देण्यात आली होती.
सायंकाळी घरी परतल्यानंतर घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानुसार त्यांनी टिळकनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी महाविद्यालयात जाऊन यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)