Join us

दहीहंडीच्या सरावादरम्यान पडून शाळकरी मुलगा मृत्यूमुखी

By admin | Updated: August 9, 2014 17:13 IST

दहीहंडीचा सरावादरम्यान पाचव्या थरावरून पडल्याने १४ वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन टीम

नवी मुंबई, दि. ९ - बालगोविंदांचा दहीहंडी फोडणा-यांच्या पथकात समावेश असावा की नाही यावरून शासन व गोविंदा पथकांदरम्यान वाद सुरू असतानाच  नवी मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान पडल्याने एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील सानपाडा येथे घटना घडली असून दहीहंडीसाठी सराव करत असताना पाचव्या थरावरून कोसळल्याने किरण तळेकर हा १४ वर्षांचा शाळकरी मुलगा मृत्यूमुखी पडला आहे. सानपाडा येथे गोविंदाचे पथक काल (शुक्रवार) रात्री सराव करत असताना किरण पाचव्या थरावरून खाली कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला व छातीला मार लागला. किरणला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान किरणचा आज मृत्यू झाला.