पनवेल : पनवेल परिसरात स्कूल व्हॅनमध्ये अतिरिक्त विद्यार्थी बसवून त्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे. परिणामी स्कूल व्हॅन आणि रिक्षा यामध्ये काहीही फरक दिसून येत नसून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. इतकेच काय तर पालक आणि शालेय व्यवस्थापनाकडून हलगर्जीपणा केला जात आहे. कमी विद्यार्थी घेऊन जाणारी व्हॅनच मिळत नाही. परिणामी आम्हाला उपलब्ध वाहनांची सेवा घ्यावी लागत असल्याचे काही पालकांनी लोकमतला सांगितले.पनवेल, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, खारघर या परिसरात मोठया प्रमाणात खाजगी शैक्षणिक संकुले उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये कॉन्वेंटस, सीबीएसी, स्टेट बोर्ड, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. सेंट जोसेफ, रेयॉन, डि.व्ही विश्वज्योती सेंट यासारख्या अनेक नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी विद्यार्थी आजूबाजूच्या वसाहतीतून येतात काही शाळांकडे स्कुलबसेस असल्यातरी त्या सर्वच ठिकाणी जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅनमध्ये पाठवले जाते. पूर्वी रिक्षांमधूनही विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असे मात्र त्यामध्ये अतिरिक्त मुलांचा भरणा केला जात असे. त्याचबरोबर रिक्षाची अवस्था अतिशय दयनिय असायची परिणामी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळत नसे, म्हणुन त्या जागी ओमिनी गाडया आल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांनी या गाडया घेतल्या त्याला स्कुल व्हॅन म्हणून संबोधले जाऊ लागले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता अधिक वाढावी याकरीता वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. त्याकरीता काही नियमावलीही परिवहन विभागाने तयार करून त्यामधील अटी आणि शर्तीचे पालन करण्याची हमी चालकांकडून घेण्यात आली. मात्र संबंधीत स्कुल व्हॅनवाल्यांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा सुरक्षिततेची कोणतीही काळजी संबंधीत मंडळीकडून घेतली जात नाही. या ठिकाणी सुरक्षितेच्या उपायायोजना केलेल्या दिसत नाहीत. अनेक गाडयांमध्ये अग्निशमन नळकांडे नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर अतिरिक्त विद्यार्थी वाहतुकही धोकादायक असून त्याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. (वार्ताहर)
स्कूल व्हॅनचे ‘कोंबिंग’
By admin | Updated: June 13, 2014 00:44 IST