सचिन लुंगसे
मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षात होणाऱ्या स्कूल बसच्या भाडेवाढीमुळे पालकांचे कंबरडे मोडणार आहे. स्कूल बसचे भाडे परवडत नाही किंवा स्कूल बसची सुविधा नसल्याने अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी वर्षाकाठी रिक्षा ठरवली आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्याची गरज रिक्षाचालक संघटना व पालकांनी व्यक्त केली आहे.
सध्या ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्याचा सर्वाधिक फटका दुपारच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या आणि सकाळच्या सत्रातून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहेत. बस अधिक वेळ कोंडीत अडकत असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांसाठी रिक्षा ठरवली आहे. रिक्षा प्रवासासाठी महिन्याला प्रति विद्यार्थ्यामागे १,२०० ते १,५०० रुपये आकारले जात आहेत. रिक्षाबरोबर अलीकडे व्हॅननेही विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे.
रिक्षातून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवानगी देत नाही, तसेच अशी परवानगी घेण्यास कोणी जाणारही नाही. विद्यार्थ्यांना रिक्षाने शाळेत ने-आण करणे धोकादायक आहे. मात्र, भाडे कमी असल्याने पालकांना ते परवडते. अपघात होणार नाही किंवा विद्यार्थ्याला कोणताही त्रास होणार नाही, यासाठी रिक्षा चालकांनी दक्ष राहिले पाहिजे.
के. के. तिवारी, मुंबई अध्यक्ष, भाजप रिक्षा-टॅक्सी सेल रिक्षातून पाच विद्यार्थ्यांची वाहतूक उपनगरांत शाळेत ये-जा करण्यासाठी रिक्षाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. अनेकदा एका रिक्षातून चार किंवा पाच मुलांची वाहतूक केली जाते. मात्र, सजग पालक तीन विद्यार्थ्यांचीच वाहतूक करण्याचा आग्रह धरताना दिसतात. दुसरीकडे अनेक रिक्षा चालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रिक्षाला सेफ्टी डोअर लावून घेतले आहेत.
व्हॅन चालक मात्र मुलांना भरभरून वाहनात बसवताना दिसतात. मुलांची दप्तरे टपावर किंवा डिक्कीत ठेवली जातात. पालकांनी अटकाव केल्यानंतर व्हॅन चालक काहीसे नरमाईने घेत असल्याचे पालक सांगतात.
स्कूल बसचे भाडे हे स्टॉप ते शाळा या किलोमीटरच्या अंतरानुसार, शाळेनिहाय किंवा शाळेच्या दर्जाप्रमाणे असल्याने ते परवडत नसल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. परिणामी, पालकांचे प्राधान्य रिक्षा व व्हॅनकडे अधिक आहे.