Join us

‘ब्लू व्हेल’पासून वाचवण्यासाठी शाळेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 02:59 IST

रशियात लहान मुलांमध्ये कुप्रसिद्ध झालेल्या आणि मुलांच्या जिवावर उठलेल्या ‘ब्लू व्हेल’ गेममुळे मुंबईतही एका मुलाचा जीव गेला. त्यानंतर पालकांच्या मनात भीती निर्माण झाली.

मुंबई : रशियात लहान मुलांमध्ये कुप्रसिद्ध झालेल्या आणि मुलांच्या जिवावर उठलेल्या ‘ब्लू व्हेल’ गेममुळे मुंबईतही एका मुलाचा जीव गेला. त्यानंतर पालकांच्या मनात भीती निर्माण झाली. आता पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी शाळांची धडपड सुरू झाली आहे. प्रख्यात बी. डी. सोमाणी इंटरनॅशनल स्कूलने यासंदर्भात पालक जागृती उपक्रम सुरू केला आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी ब्लू व्हेल गेम खेळताना आढळून आल्यानंतर शाळेने हे पाऊल उचलले आहे.सध्याच्या युगात शालेय विद्यार्थी सर्रास स्मार्ट फोन आणि इंटरनेटचा वापर करतात. अनेक पालकांनी मुलांना स्मार्ट फोन्स दिले आहेत. तर, काही पाल्य पालकांचे मोबाइलदेखील वापरतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर ही मुले कसा करतात, ते कोणते गेम डाऊनलोड करतात, याकडे पालकांचे फारसे लक्ष नसते.या शाळेतील एक विद्यार्थी ब्लू व्हेल गेम खेळताना आढळून आल्यानंतर शाळा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली. त्यानंतर शाळेने पालकांमध्ये जागृती करण्याचा निर्णय घेतला.या घटनेनंतर शाळेने पालकांना ई-मेलद्वारे सावध केले. वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर ‘ब्लू व्हेल’विषयी बरीच माहिती आलेली आहे. या गेममुळे मुलांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या मोबाइल, इंटरनेट वापराकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन मेलद्वारे करण्यात आले आहे. वेळोवेळी मोबाइलची तपासणी करून पाल्यांच्या हालचालीकडे विशेष लक्ष द्यावे, असेही प्राथमिक शाळेचे प्रमुख झो हौसर यांनी मेलमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :ब्लू व्हेल