Join us
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त रंगामुळे शाळकरी मुलगी जखमी

By admin | Updated: March 7, 2015 00:52 IST

रंगपंचमीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणनू अन्न व औषध प्रशासनाने धाडी मारून १०० नमुने ताब्यात घेतले होते.

मुंबई : होळी खेळताना रसायनयुक्त रंग वापरू नका, असे आवाहन पोलीस, अन्न व औषध प्रशासनाने केले होते. रंगपंचमीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणनू अन्न व औषध प्रशासनाने धाडी मारून १०० नमुने ताब्यात घेतले होते. तरीही रंगपंचमीच्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास चारकोप येथे एका चौदा वर्षीय मुलीवर शाळकरी मुलांनी रासायनिक रंग उडवला. यामुळे या मुलीचा चेहरा भाजला असून, तिला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायर रुग्णालयात ४ जणांना दाखल करण्यात आले असून, ५३ जणांनी मुंबईच्या विविध रुग्णालयांत उपचार घेतले आहेत. चारकोपच्या रेणुका नगरमध्ये राहणाऱ्या अक्षता कोकळे हिच्यावर मुलांनी टाकलेल्या रंगामुळे तिचा अर्धा चेहरा भाजला. इमारतीखाली येताच सात ते आठ जणांचा एक गट माझ्याजवळ आला, ज्यात तिघे माझ्या ओळखीचे असून ते आमच्याच सोसायटीमध्ये राहतात. त्यांनी रंग माझ्या अंगावर ओतला, ज्यामुळे माझा चेहऱ्याची जळजळ होऊ लागली, असे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्या मुलांनी आम्ही फक्त गुलाल टाकला, असे सांगितले आहे. याप्रकरणी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलीस करीत आहेत. अनेकदा एखाद्या रसायनामुळे चेहऱ्यावर एलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या रंगामध्ये खरंच पेट्रोल किंवा एखादा अ‍ॅसिडसदृश पदार्थ होता का, याची माहिती आम्ही घेत आहोत़ त्यासाठी शताब्दी रुग्णालयाच्या डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे, असे चारकोप पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेव्यतिरिक्त नायर रुग्णालयात चार जणांना दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. दारूच्या नशेत असल्याने पडून त्यांच्या डोक्याला मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)