Join us

शाळा चार; मात्र मुख्याध्यापक नाहीत

By admin | Updated: May 2, 2015 22:39 IST

महापालिका शाळांची घटणारी पटसंख्या ही शिक्षण विभागापुढील महत्त्वाची समस्या असताना कळव्यातील दोन इमारतींत भरणाऱ्या चार शाळांना

ठाणे : महापालिका शाळांची घटणारी पटसंख्या ही शिक्षण विभागापुढील महत्त्वाची समस्या असताना कळव्यातील दोन इमारतींत भरणाऱ्या चार शाळांना पटसंख्याही समाधानकारक असताना गेल्या काही वर्षांपासून मुख्याध्यापकच नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. तसेच शाळेसाठी असलेल्या मैदानावरच पालिकेने प्रभाग समिती कार्यालय बांधून विद्यार्थ्यांना मैदानापासून वंचित ठेवले आहे.ठाणे महापालिकेच्या कळवा येथील शाळा क्र. ६९, ७०, ७१ आणि ११५ चार वर्षांपूर्वी एकाच इमारतीत भरविल्या जात होत्या. परंतु, ही इमारत कमी पडू लागल्याने या इमारतीच्या जवळच आणखी एक नवी इमारत चार वर्षांपूर्वी उभारण्यात आली. परंतु, येथे वर्ग भरण्यापूर्वीच या शाळेला गळती लागल्याची समस्या निर्माण झाली होती. आता ही समस्या दूर झाली आहे. जुन्या इमारतीत शाळा क्र. ६९ आणि ११५ भरत आहेत. नव्या इमारतीत ७०, ७१ या शाळा भरविल्या जात आहेत. शाळा क्र. ६९ मध्ये २५३ विद्यार्थी, ७० ही उर्दू माध्यमाची शाळा असून येथे ३१९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच शाळा क्रमांक ७१ मध्ये १६४ आणि ११५ मध्ये २२५ च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या चारही शाळांची पटसंख्या समाधानकारक असतानाही गेल्या काही वर्षांपासून या शाळांना मुख्याध्यापक नसल्याने येथील शाळांचा कारभार रामभरोसे आहे. शाळांना मुख्याध्यापक मिळावेत म्हणून गेल्या काही वर्षांपासून शिक्षक संघटना शिक्षण विभागाकडे मागणी करीत आहेत. परंतु, शाळांना आजही मुख्याध्यापक मिळाले नसल्याचे या शाळांकडे पाहिल्यावर लक्षात येते. या शाळेसाठी असलेल्या मैदानावरच पालिकेने प्रभाग समिती कार्यालय उभारले असून मुख्य मैदान आता अतिशय छोटे झाले आहे. त्यात या भागात महापालिकेच्या गाड्यांसह खाजगी पार्किंग होत असल्याने ते मैदानही तुटपुंजे झाले आहे. त्यामुळे वार्षिक खेळ घ्यायचे असल्यास अथवा सराव करायचा झाल्यास या शाळांना घोलाईनगर अथवा खारेगाव येथील शाळांच्या मैदानावर अवलंबून राहावे लागत आहे. (प्रतिनिधी)