मुंबई : पालिका शाळांमधील पटसंख्या वाढविण्याच्या मोहिमेला शिक्षण खातेच हरताळ फासत असल्याचे उजेडात आले आहे़ मुंबईतील चार विभागांतील २० शाळांमध्ये तब्बल दीडशे शिक्षकांची अद्याप नियुक्ती झालेली नाही़ याचा परिणाम पटसंख्येवर होऊ लागला आहे़ शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने एक-एक विद्यार्थी दररोज गळू लागला आहे़पालिका शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य, सकस आहार व विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो़ मात्र पालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने या मोहिमेचे उद्दिष्टच धोक्यात आले आहे़ नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना उलटला तरी अद्याप काही शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक झालेली नाही़‘तांत्रिक अडचण’ असे या दिरंगाईला प्रशासन नाव देत आहे़ मात्र या अडचणीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अडचणीत आले आहे़ चेंबूर येथील महापालिका शाळेतील इयत्ता ६वीच्या वर्गात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या ३३वरून १६वर घसरली आहे़ ही बाब शिक्षण खात्याच्या कानावर टाकल्यानंतरही कोणतीच पावलं उचलण्यात येत नसल्याने मुख्याध्यापकही हवालदिल झाले आहेत़ (प्रतिनिधी)
शिक्षकांअभावी घसरतेय पालिका शाळांची पटसंख्या
By admin | Updated: July 15, 2016 01:49 IST