Join us  

सावित्रीबाईंच्या विचारांनी सकारात्मक बदल घडेल  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 5:49 AM

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ; पाच महिलांचा केला सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी पराकोटीचा त्याग केला. त्यामुळे आज आपल्यासारख्या महिला ताठ मानेने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. समाजाचा विरोध झुगारून सावित्रीबाईंनी त्याकाळी महिलांसाठी पहिली शाळा काढली. समस्त महिलांच्या उद्धारासाठी, त्यांना शिक्षणाचा, जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेल्या त्यागाची सर्व महिलांनी कल्पना करावी, त्याची जाण ठेवावी आणि त्यांच्या विचारांनी चालावे. तरच या समाजामध्ये सकारात्मक बदल घडेल, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

मुंबई काँग्रेसच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'महिला शिक्षण दिन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महिला अध्यक्षा अजंता यादव यांच्यासह मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये नायर हॉस्पिटलच्या डॉक्टर व महापौर अवॉर्ड विजेत्या डॉ. सारिका पाटील, अग्निशमन दलात सहाय्यक केंद्र अधिकारी सुनीता खोत, शिक्षिका नूतन विश्वासराव, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास आणि माटुंगा स्टेशन मास्तर नीना शांती आणि त्यांच्या महिला अधिकाऱ्यांची टीम यांचा समावेश होता.यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, प्रचंड विरोधानंतरही सावित्रीबाईंनी आपले काम सुरुच ठेवले. त्या नसत्या तर आज या सावित्रीच्या भगिनी आपल्याला दिसल्याच नसत्या. त्यांनी समाजाला जोखडातून बाहेर काढले. आज भारतामध्ये केंद्रातील भाजप सरकारकडून समाजावर खूप अन्याय सुरु आहे. जाती धर्माचे राजकारण सुरू आहे. आधी धर्माकडे जायचे, मग जातीकडे जायचे, नंतर नातींकडे जायचे हेच राजकारण भाजपचे सरकार आणि आरएसएस करत आहे. याच विचारांवर आघात करण्यासाठी आपल्या महिलांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आज निर्माण झालेली आहे.यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनीही आपले विचार मांडले.  

टॅग्स :सावित्रीबाई फुले