Join us

सावित्रीबाई फुले पुरस्कार २०१५

By admin | Updated: March 14, 2015 22:14 IST

सावित्रीबाई फुले पुरस्कार २०१५ चा दिमाखदार सोहळा वसई येथील समाज उन्नती मंदिर सभागृह येथे पार पडला. सदर पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.

वसई : लोकमत सखी मंच आणि प्रगत सामाजिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुरस्कार २०१५ चा दिमाखदार सोहळा वसई येथील समाज उन्नती मंदिर सभागृह येथे पार पडला. सदर पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.समाजातील कष्टकरी, स्वावलंबी, स्वत:च्या हिमतीवर पुढे येणाऱ्या, आलेल्या, संकटाची तमा न बाळगता आपआपल्या क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या किंबहुना इतर स्त्रिया आणि समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान म्हणजेच सावित्रीबाई फुले पुरस्कार यावर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २२ महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा येतले जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर जिल्हा, महापौर नारायण मानकर, स्थायी समिती सभापती संदेश जाधव, लोकमतचे राघवेंद्र शेठ, पालघर येथील प्रशांत पाटील, किरण बढे इ. मान्यवर उपस्थित होते. समाजातील चांगले काम करणाऱ्या स्त्रियांचा सत्कार करणे ही काळाची गरज असून हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल मी लोकमत सखी मंचचे आभार मानते, असे मत सुरेखा येतले यांनी व्यक्त केले. अशा पुरस्कारांमुळे महिलांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते, अशी भूमिका महापौर नारायण मानकर यांनी व्यक्त केली. यावेळी पुरस्कारप्राप्त अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. संगीता धायगुडे यांनीदेखील आलेल्या कठीण परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी होण्याची सूत्रे सांगितली. त्याचप्रमाणे साधना प्रधान यांनी चालवत असलेल्या सिद्धांता प्रतिष्ठान या त्यांच्या एनजीओविषयी माहिती दिली. सिद्धांता प्रतिष्ठानतर्फे २०० गरजू कुटुंबांना महिनाभराच्या जीवनावश्यक वस्तू मोफत दिल्या जातात. त्याचप्रमाणे इवेट कुटिन्हो यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिका जहागीरदार यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. विनोद गायकवाड यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रशांत पाटील, एस. एम. शेख यांनी विशेष सहकार्य केले. सदर कार्यक्रमात डॉ. चित्रा विश्वनाथन यांच्या अभिनया इन्स्टिट्यूटतर्फे सामूहिक नृत्य (भरत नाट्यम) सादर करण्यात आले. (प्रतिनिधी) संगीता धायगुडे, साधना प्रधान, इवेट कुटिन्हो, डॉ. प्राजक्ता शिंत्रे, वंदना सोनावणे, सोनल वसईकर, करिता शिंकतोडे, तरला लाल, लतिका संख्ये, रेखा गायकवाड, प्रा. मालिनी पवार , सुरेखा भोसले, अर्चना पाटील, भारती ठाकूर, विमल पाटील, मीनाताई पाटील, अरूंधती ब्रह्मकुमारी, गीता आयरे, शोभना शिरोडकर, विद्या सरनाईक.