मुंबई : दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे चिमण्यांचे मोठे नुकसान होते, त्यामुळे यंदाची दिवाळी ध्वनीविरहित फटाके वाजवून साजरी करा, असे आवाहन स्पॅरो शेल्टर या संस्थेने केले आहे.मुंबईच्या काँक्रीटच्या जंगलात यापूर्वी आसरा मिळत नसल्यामुळे चिमण्या दूर गेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोलदेखील विस्कळीत झालेला आहे. त्यातच भर म्हणजे उरल्यासुरल्या चिमण्यादेखील ध्वनी व वायुप्रदूषणामुळे मुंबईतून स्थलांतर करतील, अशी भीती यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे. फटाक्यांच्या स्फोटात भाजणे, आगी लावणे, कर्णबधिरता, पक्षांची होणारी हानी आणि वायुप्रदूषणाचा धोका फार मोठ्या प्रमाणावर होतो. अशा घटनांमधून प्रचंड वित्त व जीवितहानीही होत असते. फटाक्यांच्या रूपाने सर्व जण पैसेच जाळत असतो, त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून अपायविरहित फटाक्यांचीच आतषबाजी करावी, असेही संस्थेच्या वतीने सुचविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
चिमण्यांचे जीव वाचवा
By admin | Updated: October 23, 2014 23:22 IST