Join us
Daily Top 2Weekly Top 5

केवड्याची बेटे वाचवा...

By admin | Updated: September 1, 2014 04:58 IST

विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दूर्वा, शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा आदी रचनांमधून देवाला प्रिय पत्री, फुलांची माहिती होते.

अनिरुध्द पाटील, बोर्डीविठ्ठलाला तुळशी, गणपतीला दूर्वा, शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा आदी रचनांमधून देवाला प्रिय पत्री, फुलांची माहिती होते. निसर्गपूजक हिंदू संस्कृतीत सण, उत्सव व व्रतवैकल्याच्या माध्यमातून आरोग्य संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व मांडले आहे, मात्र उत्सवाचे बाजारीकरण होऊन पर्यावरणाचा प्रश्न बिकट बनत आहे.उत्सवाच्या निमित्ताने शहरात सुरू झालेली स्पर्धा खेड्यापाड्यात पोहोचली आहे. थर्माकोल, फायबर, प्लास्टीक इ. पासून बनवलेली मखरे, आरास, सजावट, देखावे, मुंबईतील बाजारातून खरेदी करण्याला गावातील मंडळे प्राधान्य देत आहेत. गणेशपूजेला आवश्यक खेडेगावाशी संधान साधले आहे. मधुमालती, माका, बेल, खेतदूर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, रुई आदी एकवीस प्रकारची पाने दररोज मुंबईला निर्यात होत आहेत. यामध्ये केवड्याला विशेष मागणी आहे. प्रतिनग ५० ते १०० रु. चा भाव आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र पैशांकरिता या औषधी वनस्पतीची कोवळी पाने ओरबाडली जात आहेत. केवड्याची कत्तल होत आहे.डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी आणि गावाभोवती केवड्याची अमाप बने होती. काटेरी झुडपाचा कोट भेदून जाणे अशक्य, तथापि शेतकरी कुंपणाकरिता त्याचा वापर करीत. आठ-दहा वर्षापासून केवडा दुर्मीळ बनला आहे. शहरातील फुलव्यापारी पैशाचे आमिष दाखवून स्थानिकांना भुलवत आहेत. रात्री अपरात्री केवड्याचे बन चोरी करणे, इर्षेपोटी बनाला आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. न फुलणाऱ्या केवड्याचा शेंडा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. साप अन् तत्सम जीवांच्या अधिवासाला धोका पोहचून जैवविविधता संकटात येत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणपे्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.हिंदू संस्कृतीत विविध सण, उत्सव व व्रतवैकल्याच्या माध्यमातून निसर्ग, आरोग्य आणि संस्कृती संवर्धनाचे महत्त्व वर्णिले आहे. निसर्गदेवतेशी, पर्यावरणाशी प्रामाणिक राहून सण साजरे होणे आवश्यक आहे. भावी पिढीला संदेश देण्याची गरज आहे. तरच सण उत्सवाचा आनंद मानवाला घेता येईल.