Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या विचारांतून तरुणांना प्रेरणा मिळेल - अनिल टिपणीस

By admin | Updated: June 1, 2015 02:24 IST

आजचे तरुण हे अधिक प्रबळ व सक्षम आहेत, मात्र त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांतूनच चांगले नेतृत्व मिळू शकते,

मुंबई : आजचे तरुण हे अधिक प्रबळ व सक्षम आहेत, मात्र त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांतूनच चांगले नेतृत्व मिळू शकते, या तरुणांनी राष्ट्रहितासाठी स्वयंशिस्त, राजकारणविरहित कृतिशीलता तसेच देशाच्या प्रत्येक बाबीसाठी आपल्या स्तरावर आपल्या कुवतीनुसार जागरूकता व कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे, असे विचार माजी हवाईदलप्रमुख अनिल टिपणीस यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त सावरकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘भारतीय सेना आणि आंतरिक सुरक्षा’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमात नायक नीरज कुमार सिंह यांना मरणोत्तर १ लाख रुपयांचा शौर्य पुरस्कार तर ५० हजार रुपयांचा विज्ञान पुरस्कार व्यंकटेश परळीकर यांना त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी होते.बाह्य सुरक्षेसाठी आपले सैन्य दल सक्षम आहे. मात्र, त्यांच्या निर्णयांना राजनैतिक पातळीवर सन्मान मिळावा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा सैन्यदलातलाच असावा, त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळात देशाच्या सुरक्षेबाबत निर्णय घेताना तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत घेतले जावेत, पाकिस्तान, चीन यांच्याबाबत पूर्वीच्या चुका टाळण्यासाठी नेहमीच दक्षता हवी, असेही टिपणीस यांनी सांगितले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच स्वयंसिद्धतेसाठी, आवश्यक असलेली आव्हाने पेलण्यासाठी शासनकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्या विचारांचा वारसा नव्या पिढीत संक्रमित करून पिढी घडवली पाहिजे, ही जबाबदारी प्रत्येक सुजाण नागरिकाची असायला हवी, असे विचार स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी समारोपात व्यक्त केले.