लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९३० सालापासून देशाच्या सुरक्षेचा विचार केला होता आणि त्यानुसार अंदमान, लक्षद्विप बेटांवर सैनिकी तळ, आसाम व पूर्व बंगालमधील घुसखोरी थांबविण्यासाठी दिलेले इशारे, सागरी सीमांचे रक्षण आदी मुद्यांवर विचार केला गेला नाही, त्यामुळेच खलिस्तान, पूर्वांचाल, माओवाद, नक्षलवाद, आयएसआय यांचा दहशतवाद निर्माण झाला, म्हणूनच आज त्यांच्या विचारांचे सरकार स्वातंत्र्यवीरांचे विचार ध्यानात ठेवून त्यांचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार तरुण विजय यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३४ व्या जयंती सोहळ्यात ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शौर्य पुरस्कार नायक पांडुरंग गावडे यांना तर विज्ञान पुरस्कार जितेंद्र जाधव यांना प्रदान करण्यात आला.ज्यावेळी राष्ट्रभक्तीची चर्चा होईल, त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्थान सर्वोच्च असेल. बाल्यवस्थेत त्यांनी शिवरायांची आरती रचिली, ती आजदेखील त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांची भावना किती प्रबळ व प्रखर होती, याची साक्ष देते. त्यामुळे त्यांच्या विचारांना आपण ध्यानात घेतले पाहिजे. आज सैन्यांवर दगडफेक करणा-यांच्या समर्थनार्थ लिहणाऱ्या लेखण्यांनी हे विचारात घ्यावे तसेच या महापुरूषांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, असे विचार देखील तरुण विजय यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सर्वदूर नेण्यासाठी स्मारकाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याची व्याप्ती येणा-या काळात अधिकाधिक विस्तारीत होईल तसेच देशाच्या अखंडता आणि एकात्मतेला पोषक वातावरणनिर्मिती त्यातून स्मारकाच्या वतीने केली जाईल, असे विचार अध्यक्षीय भाषणात स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना जितेंद्र जाधव यांनी भारतमातेची सेवा हीच ईश्वरसेवा हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार लहानपणीच आपल्या मनावर बिंबला गेला असल्यामुळे आपण देशरक्षणार्थ सेवेसाठी प्रोत्साहित झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर आपण आपल्या स्वदेशी बनावटीच्या माध्यमातून त्यांच्या विचारांनुसार शस्त्रसज्ज अधिक प्रभावीपणे व प्रबळपणे होऊ शकू, असा विश्वासदेखील व्यक्त केला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लोणीशिल्प साकारणारे शेफ भूषण चिखलकर, जितेंद्र काळे व रोहन खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करणारे व आनंदवारी ब्लॉगनिर्मिती केलेले आनंद शिंदे यांनादेखील सन्मानित करण्यात आले.
सावरकरांचे देशाच्या सुरक्षेचे विचार हेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक - तरुण विजय
By admin | Updated: May 30, 2017 06:37 IST