मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक साहित्याचे ब्रेल रूपांतरण स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या आत्मार्पण वर्षाचे औचित्य साधून हे साहित्य महाराष्ट्रातील निवडक शाळांना मोफत वितरित करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ स्मारकाच्या वतीने सोमवारी ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर दी ब्लाइंड या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी भेट देऊन करण्यात आला.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर, सहा सोनेरी पाने, शत्रूच्या शिबिरात, हे हुतात्म्यांनो, माझी जन्मठेप, स्वातंत्र्याचा क्रांतिघोष, हिंदुराष्ट्रदर्शन, हिंदुपदपातशाही, हिंदुत्व, आत्महत्या आणि आत्मार्पण, गांधीगोंधळ, गरमागरम चिवडा, अंदमानची पत्रं, स्वातंत्र्यवीर सावरकर व्यक्ती आणि तत्त्वज्ञान या शीर्षकाचे हे ग्रंथ एकूण २५ भागांमध्ये आहेत.या वेळी झालेल्या छोटेखानी समारंभास शाळेचे विद्यार्थी तसेच सरचिटणीस अंजली लाड, ग्रंथपाल अनिता शिंदे, विजया महाडिक व स्मारकाच्या वतीने सह कार्यवाह राजेंद्र्र वराडकर, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य व विचार अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचावे, देशभक्तीच्या त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार अधिकाधिक व्यापकतेने व्हावा, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
सावरकरांचे ब्रेलमधील साहित्य शाळांपर्यंत पोहोचविणार
By admin | Updated: August 11, 2015 04:06 IST