Join us  

सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेली रिक्षा पाहिलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 8:51 AM

एक भन्नाट रिक्षा सध्या मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसत आहे.

ठळक मुद्देमुंबईकर रिक्षाचालकाने प्रवाशांना उत्तम प्रवास करता यावा या हेतूने रिक्षामध्ये अनेक सोयी-सुविधा दिल्या आहे. सत्यवान गीते असं या रिक्षा चालकाचे नाव आहे.चार्जिंग पॉईंट, मॉनिटर, शुद्ध पाणी, वॉश बेसिन यासारख्या सुविधा रिक्षामध्ये देण्यात आल्या आहेत.

मुंबई - प्रवासासाठी मुंबईकर लोकल, बस, ऑटो रिक्षाचा वापर हमखास करतात. ग्राहकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक गोष्टी या सातत्याने केल्या जात असतात. अशीच एक भन्नाट रिक्षा सध्या मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. मुंबईकर रिक्षाचालकाने प्रवाशांना उत्तम प्रवास करता यावा या हेतूने रिक्षामध्ये अनेक सोयी-सुविधा दिल्या आहे. सत्यवान गीते असं या रिक्षा चालकाचे नाव आहे. फोन चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉईंट, डेकस्टॉप मॉनिटर, पिण्यासाठी शुद्ध पाणी, हात धुण्यासाठी वॉश बेसिन यासारख्या सुविधा या रिक्षामध्ये देण्यात आल्या आहेत. 

जेष्ठ नागरिकांची गीते यांनी खास काळजी घेतली आहे. त्यांना 1 किलोमीटरपर्यंतचा प्रवास हा मोफत असणार आहे. 'माझ्या रिक्षामध्ये प्रवासी त्यांचा फोन चार्ज करू शकतात. पिण्यासाठी शुद्ध पाणी, वॉश बेसिन देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना 1 किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास हा मोफत करता येणार आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यात याव्या या उद्देशाने अशा पद्धतीने रिक्षा तयार केली आहे' अशी माहिती सत्यवान गीते यांनी दिली आहे. गीते यांची रिक्षा सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

सत्यवान गीते यांनी काही महिन्यांपूर्वी रिक्षातच गणेशाची स्थापना केली होती. रिक्षातच गणराज विराजमान झाले होते. गणेशोत्सवात रिक्षा घेऊन गीते मुंबई नगरात दहा दिवस फिरतात. अनेक लोकांनी त्यांच्या रिक्षातील गणेशाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. मंडळाच्या बाहेर रिक्षा उभी केल्यानंतर अनेकांनी गणराय आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढला होता. गीते हे 1996 सालापासून रिक्षा चालवितात. त्यांच्या रिक्षात त्यांनी गणेशाची स्थापना केली होती. 

रिक्षात गीते यांनी दीड फुटाची मुर्ती मागच्या बाजूस बसविली होती. तिला हार फूलांची सजावटही केली होती. तसेच त्याठिकाणी रिक्षांची प्रतिकृती असलेल्या लहान लहान रिक्षा ठेवल्या आणि डीव्हीडी लावला होता. त्यावर गणेशाची गाणी वाजविली जात होती. गीते यांची गणेशावर श्रद्धा आहे. रिक्षा व्यवसाय सांभाळून त्याना घरी गणेशाची पूजा अर्चा करणे जमत नाही. त्यामुळे त्यांनी ही शक्कल लढविली होती. दहा दिवसानंतर जुहू येथे जाऊन गणेशाचे विसजर्न केले. त्यांचा हा 'रिक्षा गणेश' चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर आता गीते यांच्या सुसज्ज रिक्षाची मुंबईत चर्चा रंगली आहे. 

 

टॅग्स :मुंबईऑटो रिक्षा