Join us
Daily Top 2Weekly Top 5

सत्यनारायण पूजा पोलीस बंदोबस्तात

By admin | Updated: February 1, 2015 01:46 IST

महात्मा जोतिबा फुले यांचे नाव असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील इमारतीमध्ये विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेने पोलीस बंदोबस्तात सत्यनारायण पूजा उरकून घेतली.

मुंबई : महात्मा जोतिबा फुले यांचे नाव असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील इमारतीमध्ये विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेने पोलीस बंदोबस्तात सत्यनारायण पूजा उरकून घेतली. सत्यनारायण महापूजेनिमित्त कामात चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. शासनाचे आदेश धुडकावून विद्यापीठात सत्यनारायण पूजा होत असतानाही विद्यापीठ प्रशासनाने याकडे बघ्याची भूमिका घेतल्याने पुरोगामी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.शासकीय आदेश धाब्यावर बसवत विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी फुले भवनमध्ये अंधश्रद्धेचा जागर घातला. फुले भवनमध्ये सत्यनारायण महापूजा होणार असल्याचे समजताच पुरोगामी कार्यकर्त्यांनी याला विरोध करण्याची भूमिका घेतली. याची माहिती मिळताच पोलिसांनी कलिना परिसरात बंदोबस्त वाढवला. शासकीय कार्यालयांमध्ये धार्मिक कार्यक्रम करू नयेत, असे शासनाचे आदेश असताना विद्यापीठानेही या कर्मचाऱ्यांना कार्यक्रम करण्यापासून रोखले नाही. सुटीच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करावा, अशा सूचना विद्यापीठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. तरीही हा कार्यक्रम कामकाजाच्या दिवशीच आयोजित करण्यात आला. कर्मचाऱ्यांकडून या दिवशी कामचुकारपणा झाला असल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सांगितले. विद्यापीठात विज्ञानवादी दृष्टिकोन वाढण्याऐवजी अंधश्रद्धेचा जागर घातला जात आहे. विद्यापीठात होणाऱ्या सत्यनारायण महापूजा तातडीने बंद कराव्यात अन्यथा विद्यापीठाच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा बहुजन समाज पार्टीचे प्रज्ञेश सोनावणे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)